अर्शदीप सिंहच्या भेदकतेसमोर बांगलादेशी फलंदाजीची तारांबळ उडाल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजांसमोर त्यांच्या गोलंदाजांचीही अक्षरशः तारांबळ उडाली. हिंदुस्थानने कसोटी मालिकेतील आपला वेगवान खेळ टी-20 तही कायम राखत 49 चेंडू आणि 7 विकेट राखत तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आपल्या भन्नाट गोलंदाजीने 3 विकेट टिपणारा अर्शदीप हिंदुस्थानी विजयाचा शिल्पकार ठरला.
टी-20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरल्यानंतर प्रथमच मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने आपला घणाघाती खेळ ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदे स्टेडियमवरही कायम राखला. 128 धावांचे आव्हान झंझावाती हिंदुस्थानी फलंदाजांना अत्यंतच माफक भासले. त्यांनी बाराव्या षटकातच अवघ्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.
संजू सॅमसन (29), अभिषेक शर्मा (16), सूर्यकुमार यादव (29) यांच्या फटकेबाजीनंतर हार्दिक पंड्याने 16 चेंडूंत 5 चौकारांसह 2 षटकार खेचत नाबाद 39 धावा ठोकल्या आणि संघाला खणखणीत विजयी सलामी मिळवून दिली. त्याने तस्किन अहमदला सलग 4, 4 आणि 6 ठोकत विजयी लक्ष्य गाठले. तसेच पदार्पणवीर नितीशपुमार रेड्डीसह त्याने चौथ्या विकेटसाठी 52 धावांची विजयी आणि अभेद्य भागीही रचली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानला अर्शदीप सिंहने अपेक्षित सुरुवात करून देताना पहिल्याच षटकात लिटन दासला (4) बाद केले आणि आपल्या पुढच्याच षटकात परवेज होसैनचा त्रिफळा उडवत सलामीवीरांना तंबूत धाडले. तीन चेंडूंत दोन्ही सलामीवीरांना बाद केल्यानंतर बांगलादेशी डावाला कुणीच वेग देऊ शकला नाही.
कर्णधार नजमुल हुसेन शांतोने काहीकाळ किल्ला लढवला, पण त्यालाही टी-20 ला साजेसा खेळ करता आला नाही. 57 धावांत अर्धा संघ गमावल्यावर मेहदी हसन मिराजने 35 धावांची नाबाद खेळी करत संघाला कसेबसे 127 पर्यंत नेले. अर्शदीपने 14 धावांत 3 तर वरुण चक्रवर्तीने 31 धावांत 3 विकेट टिपल्या.
मयांक, नितीशचे पदार्पण
आज हिंदुस्थानी संघात मयांक यादव आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. मयांकने आपले पहिलेच षटक निर्धाव टाकले आणि त्यानंतर दुसऱ्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर महमुदुल्लाहला बाद करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय विकेट टिपला. तसेच नितीश रेड्डीने दोन षटके गोलंदाजी केली, पण त्याला एकही विकेट टिपता आला नाही. मात्र त्याने हार्दिक पंड्यासह 52 धावांची अभेद्य भागी करताना नाबाद 16 धावा केल्या.