
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. कोरोनाची लाट तीव्र झाल्याने अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या विस्फोटानंतर हजारो रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून काही धक्कादायक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यात रुग्णालय आणि स्मशानभूमीसमोर मृतदेहांचे ढीग दिसत आहेत. दुसरीकडे अमेरिकेती पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे.
आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी एनसीडीसी आणि आयसीएमआरला एक पत्र पाठवले आहे. तसेच सर्व राज्यांना जीनोम सीव्केन्सिंगवर जोर देण्यास सांगण्यात आले आहे. सध्या देशात कोरोनाचे रुग्ण नाममात्र असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. परंतु संपूर्ण जगात कोरोना पुन्हा पसरू लागल्याने सरकार गाफील राहू शकत नाही.
त्यामुळे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एनसीडीसी आणि आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेळीच ओळखायचा असेल तर त्यासाठी जीनोम सीक्वेन्सिंग आवश्यक आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी जीमोन सीक्वेन्सिंगचे सँपल पाठवावे, असे निर्देशही त्यांनी दिले. एकीकडे केंद्राने सर्व राज्यांना सावध रहायला सांगितले असले तरी दुसरीकडे पॅनिक न होण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये देशातील कोरोना स्थितीची चर्चा होईल. तसेच चीन, अमेरिकेसह इतर देशांमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या वाढीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya to hold a meeting with senior officials and experts on the COVID-19 situation in the country tomorrow: Sources pic.twitter.com/8CYmNaIHS8
— ANI (@ANI) December 20, 2022
चीनमधील परिस्थिती हाताबाहेर?
चीनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळतेय. याबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नसली तरीही कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची नीट व्यवस्था लावण्यासाठी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करावे लागल्याचे शवागरातील कामगारांनी नमूद केले आहे. तसेच फीगल-डिंग यांच्या दाव्याला अमेरिकास्थित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) पाठिंबा दिला होता. चीनमध्ये कोविड -19 प्रकरणांचा स्फोट होऊ शकतो आणि 2023 साला पर्यंत 10 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.




























































