महागाई 7.39 टक्क्याने वाढली!

कच्चे खनिज तेल आणि धातूंच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्यामुळे घाऊक किमतींवर आधारित (डब्ल्युपीआय) चलनवाढ मार्च महिन्यात 7.39 टक्के नोंदवली गेली आहे. गेल्या आठ वर्षात ही सर्वाधिक महागाई आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस देशात प्रदीर्घकाळ लॉकडाऊन होते. त्यामुळे चलनवाढीची टक्केवारी खाली आली होती. त्यानंतर डब्ल्युपीआय चलनवाढ सातत्याने बदलत राहिली. मात्र मार्च 2021 मध्ये घाऊक दराधारित चलनवाढ आठ वर्षात सर्वाधिक उच्चांकी पातळीवर आली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये 4.17 टक्के चलनवाढ होती, मार्च 2020 मध्ये ती 0.42 टक्के होती. मात्र चालू वर्षाच्या पहिल्या तिन्ही महिन्यांत चलनवाढ सातत्याने होते आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2021 मधील चलनवाढ 7.39 टक्के इतकी उच्चांकी नोंदवली गेली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2012 मध्ये चलनवाढ 7.40 टक्के नोंदवली गेली होती.

यंदा मार्च महिन्यात डाळी, फळे व तृणधान्ये यांच्या किंमतींत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांचा महागाईचा दर 3.24 टक्क्यांवर गेला. भाज्यांचे भाव मात्र उणे 5.19 टक्के झाले. फेब्रुवारी महिन्यात ही भाववाढ उणे 2.90 टक्के झाली होती. इंधन आणि विजेच्या दरांत मार्चमध्ये 10.25 टक्के वाढ दिसून आली. फेब्रुवारीमध्ये ही वाढ केवळ 0.58 टक्के होती. इंधन दरांतील चलनवाढ ही मुख्यतः पेट्रोल व डिझेलमधील दरवाढीमुळे झाली आहे. याशिवाय धातूंचे भावही मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढले.

मार्चमध्ये रिटेल चलनवाढ चार महिन्यांच्या उच्चांकी जात 5.52 टक्के नोंदवली. रिझर्व्ह बँकेने यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात कोणतेही दरबदल केले नाहीत. आता रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये संपणाऱया तिमाहीअखेर रिटेल चलनवाढीचे 5.20 टक्क्यांचे लक्ष्य ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या