सागरी सुरक्षा बळकट, आयएनएस विशाखापट्टणम विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील नौदल गोदीत 21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम या पी15बी स्टेल्थ गायडेड मिसाईल विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. विशाखापट्टणम श्रेणीच्या चारपैकी हिंदुस्थानी नौदलाच्या स्वतःच्या जहाज रचना संचालनालयाने संपूर्णपणे हिंदुस्थानात रचना केलेल्या आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबईकडून बांधणी केलेल्या पहिल्या विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे.

आयएनएस विशाखापट्टणम ही देशाच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे संरक्षण मंत्री या समारंभात बोलताना म्हणाले. त्यांनी सांगितले की, ही विनाशिका प्राचीन आणि मध्ययुगीन हिंदुस्थानच्या सागरी सामर्थ्याचे, जहाज बांधणी कौशल्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारी आहे. अत्याधुनिक यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी ही अत्याधुनिक विनाशिका सागरी सुरक्षा बळकट करेल आणि राष्ट्रहिताचे रक्षण करेल असा विश्वासराजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. सशस्त्र दल आणि संपूर्ण देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करू शकणारी जगातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गायडेड क्षेपणास्त्र युद्धनौकांपैकी एक ही युद्धनौका आहे, असे त्यांनी या विनाशिकेचे वर्णन केले.

7400 टन वजनाची ही अतिशय दिमाखदार विनाशिका 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे आणि हिंदुस्थानात बांधणी करण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि विशेष क्षमता असलेल्या युद्धनौकांपैकी एक म्हणता येईल. कंबाईन्ड गॅस आणि गॅस प्रॉपल्शन प्रणालीचे मिश्रण असलेल्या चार अतिशय ताकदवान टर्बाईन्सवर अतिशय वेगाने पाणी कापत पुढे जाणारी ही युद्धनौका असून ती 30 नॉटपेक्षा (ताशी 30 सागरी मैल किंवा 54 किमी) जास्त वेग प्राप्त करू शकते.

ही विनाशिका स्टेल्थ म्हणजे रडारला चकवा देणारी असल्याने तिच्या संपूर्ण सांगाड्याचा आकार आणि त्यावरील आवरण रडारला चकवा देण्याच्या वैशिष्ट्यांसह कमीत कमी काटछेदासह बनवण्यात आले आहे. फुल बीम सुपरस्ट्रक्चर डिझाईन, प्लेटेड मास्ट आणि खुल्या डेकवर रडार लहरींना परतू न देणाऱ्या सामग्रीचा वापर अशा वैशिष्ट्यांमुळे रडारला चकवा देण्याची क्षमता या विनाशिकेत आहे.

अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी ही विनाशिका सुसज्ज आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि लघु पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा यात समावेश आहे. मारा करणाऱ्या तोफा आणि इतर प्रणालीला लक्ष्याची तपशीलवार माहिती देणारे अत्याधुनिक टेहळणी रडार यावर बसवण्यात आले आहे. या विनाशिकेची पाणबुडीविरोधी क्षमता बळकट करण्यासाठी स्वदेशी बनावटीची रॉकेट लॉन्चर्स, टॉर्पेडो लॉन्चर्स आणि एएसडब्लू हेलिकॉप्टर्स आहेत. आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांना तोंड देण्याची या विनाशिकेमध्ये क्षमता आहे. या विनाशिकेच्या बांधणीत स्वदेशी बनावटीच्या सुमारे 75 टक्के सामग्रीचा समावेश असल्याने आत्मनिर्भर भारतमध्ये तिचे मोलाचे योगदान आहे. युद्ध व्यवस्थापन प्रणाली, रॉकेट लॉन्चर, टॉर्पेडो ट्युब लॉन्चर, इंटेग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम, स्वयंचलित उर्जा व्यवस्थापन प्रणाली, फोल्डेबल हँगर डोअर, हेलो ट्रॅव्हर्सिंग प्रणाली, क्लोज इन वेपन सिस्टम आणि बो माऊंटेड सोनार यांसारख्या स्वदेशी बनावटीच्या प्रणालींचा यात समावेश आहे.

पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील ऐतिहासिक शहर असलेल्या विशाखापट्टणमच्या नावावरून या विनाशिकेचे नाव ठेवण्यात आले आहे. या विनाशिकेवर 315 कर्मचारी, त्यांच्या आरामदायी निवासाच्या सोयीसह तैनात करण्याची व्यवस्था आहे. दिशादर्शन आणि निर्देश तज्ञ असलेले कॅप्टन बीरेंद्र सिंह बैन्स यांच्याकडे या विनाशिकेची धुरा सोपवण्यात आली आहे.

हिंदी महासागर क्षेत्रातील बदलत राहणाऱ्या सामर्थ्याच्या स्वरुपानुसार भारतीय नौदलाची त्वरेने हालचाल करण्याची क्षमता, पल्ला आणि आपली कामगिरी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची लवचिकता यामध्ये आयएनएस विशाखापट्टणमच्या आगमनामुळे वाढ होणार आहे.