
रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळ विरित्सा गावाजवळ 1362 मानवी सांगाडे सापडले आहेत. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या एसएस दलाने इथे त्या काळी बनविलेल्या तळाजवळ असलेल्या जागेतून हे सांगाडे सापडले आहेत. ही जागा जखमी जर्मन सैनिकांना रक्त चढवण्यासाठीच्या कॅम्पमुळे ओळखली जात होती. या जागेतून अजूनही सांगाडे सापडण्याची शक्यता असल्याचं संशोधकांनी सांगितले आहे. मानवी सांगाड्याच्या जवळपास 50 गोण्या आतापर्यंत बाहेर काढण्यात आल्या आहेत.
लेनिनग्राड भागातील नोवाया बुर्या गावात हे सांगाडे सापडले आहेत. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख व्हीक्टर इओनोव्ह यांनी सांगितले की हे सांगाडे सापडणं थांबतच नव्हतं. एका मागोमागे एक मानवी सांगाडे बाहेर येतच होते. ज्यांचे सांगाडे सापडले त्यांच्या अंगावर कपडाही नव्हता आणि पायात बूटही नव्हते. त्यांना कोणत्या जखमाही झालेल्या नव्हत्या. हे सगळे सांगाडे बाळांचे,लहान मुलांचे आणि महिलांचे आहेत. जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी लागणारं रक्त या लहान मुलांच्या अंगातून काढलं जात होतं असं सांगितलं जातंय.
जे सांगाडे सापडले आहेत त्यामध्ये महिलाही होत्या. ज्यातल्या किमान 3 जणी या गर्भवती होत्या. 1362 मानवी सांगाड्यांपैकी 675 सांगाडे हे लहान मुलांचे आहेत. ज्या पद्धतीने हे सांगाडे बाहेर येत गेले ते पाहून या सगळ्यांसोबत किती अत्याचार केले गेले असतील याचा विचार करून अंगावर काटा आला असं इओनोव्ह यांनी म्हटलंय. लेनिनग्राडला हिटलरच्या सैन्याने 1941 ते 1943 या काळात वेढा घातला होता. त्यासाठी हा कॅम्प उभारण्यात आला होता.

























































