इंटरसिटी एक्सप्रेस 11 जूनपर्यंत नव्या वेळापत्रकानुसारच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई ते पुणे या दोन महानगरांना जोडणार्‍या इंटरसिटी एक्सप्रेसला पुढे आणि मागे असे डबल इंजिन लावून प्रवाशांच्या वेळेत बचत करण्यात 2 तास 35 मिनिटे हे वेळापत्रक खूपच काटेकोर ठरत असल्याने तिला आणखीन दहा मिनिटांचा वेळ देण्याचा मध्य रेल्वेचा इरादा आहे. त्यामुळे पुन्हा 11 जूनपर्यंत मुंबई ते पुणे इंटरसिटी नव्या वेळापत्रकाप्रमाणेच धावणार आहे.

एरवी इंटरसिटीला पुण्यास जाण्यासाठी तब्बल 3 तास 17 मिनिटे लागतात. मात्र डबल इंजिन लावून हा वेग 2 तास 35 मिनिटे करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न होता. हा प्रयत्न सबर्बन ट्रफिकमुळे किंवा इतर आयत्यावेळी उद्भवणार्‍या तांत्रिक बिघाडाने तंतोतंत पालन होणे कठीण असल्याचे पहिल्या चाचणीत उघड झाले आहे. त्यामुळे बदलल्या वेळापत्रकानुसार इंटरसिटीची पुन्हा 11 जूनपर्यंत ‘पुशपूल’ चाचणी सुरूच राहणार आहे. 2 तास 35 मिनिटांचे तंतोतंत पालन होत नसल्याने आता दहा मिनिटे आणखीन वाढवून 2 तास 45 मिनिटे असे नवे वेळ बचतीचे टार्गेट करण्याचा विचार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.