जे जे चा विद्यार्थी – रवी जाधव

267

>> मिलिंद शिंदे

‘दिग्दर्शक रवी जाधव’ ‘मी नक्की काय करू…’ पासून एक यशस्वी दिग्दर्शक हा प्रवास खरंच रंजक.

“लॉबी?’’ मी.
हो लॉबी… रवी पलीकडून फोनवर.
मला काही केल्या लॉबी लक्षात येईना. मी भलतीकडेच निघालो. पुन्हा रवीचा फोन.
‘‘लॉबी.’’
त्या उंच अस्मानाला भिडणाऱया इमारतीमधून मला रवी म्हणत होता ती लॉबी काही केल्या लक्षात येईना.
मग त्याचा पुन्हा फोन आला आणि म्हणाला, ‘तू मला दिसलास.’
चौथ्या मजल्यावरच्या त्याच्या ऑफिसमधून त्या चकाकणाऱया काचांमधून तो मला गाईड करीत होता. लेफ्ट घे, राईट घे. तरीही मला काही ती लॉबी सापडेना. त्यानं त्याच्या कार्यालयातल्या सहकाऱयालाही पाठवलं, पण माझं अज्ञान, शेवटी रवीच खाली आला. वडील गिरणी कामगार. कोकणातून आलेले. दोन भाऊ, त्यातला एक रिक्षा चालवतो अजूनही, दुसरा जेमतेम कमवतो. एक बहीण. रवी हे सांगायला अजिबात कचरत नाही. रवी मोकळा आहे. लहानपण वरळीच्या बीडीडी चाळीत गेलेलं (अर्थात तो वरळीला अजूनही जातो). रवी आव आणत नाही, तो पोझी नाही, स्वतःला मी कुणीतरी मोठा असल्याचा मुलामाही देत नाही. आम्ही लिफ्टमधून वर जातानाही तो लिफ्टमधल्या अनोळखी व्यक्तीशी बोलत होता. विनोद करीत होता. असा रवी. आपण कुणीतरी असल्याचा चेहऱयावर भाव नाही. एकदम आरपार, पारदर्शक, खरा. ऑफिसमध्येही ‘नटरंग’चा मोठा फोटो नाही, ना ‘बालगंधर्व’चा मोठा कटआऊट, ना ‘न्यूड’चा काही बडेजाव… तो त्याच्या वर्किंग स्पेसला साधं ठेवतोच, पण त्यातली कलात्मकताही जपतो हे त्याचं सजवलेले उत्तम आरेखित केलेल्या कार्यालयातून पदोपदी जाणवतं.
‘‘सगळय़ांचे निकाल लागले, तुझा निकाल कुठंय?’’ रवीचे वडील।
‘‘निकाल नाहीये’’ – भेदरलेला रवी..
‘का?’ वडील
कारण मी परीक्षाच दिली नाही. कारण मला नापास व्हायचं नव्हतं. म्हणून मी परीक्षाच दिली नाही.
या खोटं बोलण्याचा आणि वागण्याचा रवीच्या वडिलांना राग आला. दोघांमध्ये वाद झाला.
वडापावची गाडी टाकू…?
नाही, पेपरच टाकतो.
पंक्चरचं दुकान टाकू
की एखादी टपरी?
अशा एक ना अनेक प्रश्नांचा कोलाहल रवीच्या मनात सुरू होतो. दिशा सापडत नव्हती, पण एक दिवस त्याला आतल्या एका हाकाऱयानं भान दिलं आणि रवीमधल्या दडलेल्या चित्रकारानं उचल खाल्ली. त्याच्यातला दडलेला कलावंत काही म्हणू पाहू लागला आणि काही मित्रांच्या सहवासानं तो जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्कडे वळला (जी कला क्षेत्रातील सर्वोत्तम संस्था मानली जाते). त्या मित्रांमध्ये त्याचा बालपणीचा मित्र आणि आजचा आघाडीचा सिनेमॅटोग्राफर महेश लिमये होता. रंजक घडामोडीनंतर रवीनं जे.जे.मध्ये प्रवेश मिळवला, अर्थात मेरीटवर… संपूर्ण अभ्यासक्रम रवीने अगदी मनापासून पूर्ण कला. जणू काही हेच हवं होतं आणि हेच पाहिजे होतं याचा ध्यास घेतल्यासारखं स्वतःला त्यानं त्यात पूर्णपणे गुंतवून घेतलं. त्याचंच फलित म्हणून जेव्हा शेवटच्या वर्षाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला एक नाही, दोन नाही, तर पाच जाहिरात कंपन्यांकडून ऑफर आली. त्यातली एक जाहिरात क्षेत्रातली नामांकित कंपनी FCB उल्का रवीनं निवडली आणि पुन्हा रवी जोमाने कामाला लागला. नवी वाट सापडल्यासारखा आणि मग रवी नावाचा चमत्कार जाहिरात क्षेत्रातल्या एका एका माध्यमावर विजय मिळवत निघाला. रेल्वेचा पास नसलेला रवी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ लागला आणि सिनेमा दिग्दर्शित करायलाच इथपर्यंत येऊन पोहोचला.
आपल्या मातीतलं काहीतरी करावं असं त्याला वाटलं. पण मधल्या जाहिरात कंपनीच्या प्रवासात इंग्रजीचा अनुनय झाल्यानं मराठी साहित्यापासून काहीसा टच हरवलेला. अनेक नामवंत जाहिरातींसाठी यशस्वी काम केल्यावर इथंही यश हवंच म्हणून एक धांडोळा सुरू झाला.
गणपत पाटील?
मग संशोधन सुरू झालं. त्यांचं एक लहानसं पुस्तक मिळालं, पण रवीला त्यात फार नवं मिळालं नाही. म्हणजे सगळं छान छान होतं. होतं का? हा रवीचा शोध होता. वेदना नव्हती.
‘नटरंग’ आनंद यादवांची कादंबरी वाचनात आली आणि काहीतरी गवसल्याचा आनंद रवीला झाला.
मग कथेवर काम, अनेक गावांना भेटी, तमाशा फडांना भेटी, तमाशा कलावंतांना भेटला. रवी जाधव त्यांच्या हसण्यापलीकडचं जग शोधत होता. ते त्याला गुरू ठाकूरच्या गाण्यातून आणि अजय-अतुलच्या साथीनं उभं करता आलं. आणि झी टी.व्ही.च्या सहकार्यानं ‘नटरंग’ पडद्यावर झळकला आणि इतिहास झाला.
मग ‘बालगंधर्व’.
एक अतुलनीय आयुष्यपटच रवीनं रसिकांसमोर मांडला, गाजला आणि चरित्रपटांचा जमाना सुरू झाला.
जोडून ‘टी.पी.’सारखा धाडसी विषय, ‘टी.पी.’ ‘टी.पी.’सारखे पौगंड किशोर युवकांच्या अंतरंगाची गोष्ट सांगणारे चित्रपट, ‘मित्रा’सारखा वेगळा सिनेमा चळवळीला कलावंताचं सहकार्य कसं असावं याचं नितांत सुंदर उदाहरण (377 कलम) मग कला कुणाची जागीर नसते हे अधोरेखित करणारा. ‘बेंजो’ सिनेमा. रितेश देशमुख यांनी या सिनेमात खूप छान काम केलंय आणि रवीनं ‘बॉलीवूडमध्ये मिलिंद शिंदे नावाचा नवीन खलनायक येतोय’ असं पोस्ट केलं होतं फेसबुकवर. रवी देवा… (देवा हा जे.जे. मधला शब्द) ‘रंपाट’ (रवीचा मनस्वी सिनेमा, रवी अतिशय अप्रतिम नृत्य करतो) आणि न्यूड.
‘नटरंग’चा बिभत्स होऊ शकणारा पुरुषावर बलात्कार करणारा पुरुष हे रवीनं जितक्या संयतपणे चितारलंय ना तितकाच संयत ‘न्यूड’.
‘न्यूड’बद्दल कुणीतरी रवीला विचारलं की, यमुना शेवटी आत्महत्या करते की मरते? रवीनं उत्तर दिलं, ‘‘अलीकडच्या ‘हो रे – नाही रे’ ती कोलाहलात नाहीशी होते. बघा ना… सागरासमोर ती उभी आहे यमुना शेवटच्या प्रसंगात आणि लुप्त होताना दिसते. रवी टच.
ज्या शाळेत रवी शिकला (जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्) त्या वास्तूला, संस्थेला रवीचं हे नमन आहे असं रवी मानतो. रवीच्या कामाच्या झपाटय़ात मेघनाचाही (त्याची पत्नी) तितकाच सहभाग असतो. तिच्या कामाचा उरक ज्यांनी रवीसोबत काम केलंय त्यांनी अनुभवलाय.
पण हा मनस्वी, तरल, साहसी, धाडसी, बेफाम, दिग्दर्शकाच्या पलीकडचा रवी आई-वडील, पत्नी, दोन मुलं यांच्यावर नितांत जीव टाकणारा आहेच आहे, पण कामावरही तितकाच.
चंद्राक्का आणि यमुनाचे रुदन पाहून भर पावसात रडणारे जे.जे. हा शॉट पाहून क्लासचं मन आक्रंदून येतं, तर मासला गलबलून येतं. असा सुवर्णमध्य साधणारा तू ती प्रतिमा आमच्या मनावर कोरतोसच. अनंत काळासाठी अंतर्मुख होण्यासाठी, सखेद विचार करण्यासाठी…

आपली प्रतिक्रिया द्या