खवय्यी!

186

>> शेफ विष्णू मनोहर

असे म्हणतात, माणूस जसे खातो तसाच तो असतो. श्रेया बुगडे. म्हणजे हसवणारा हास्याचा धबधबा. श्रेयाच्या खाण्याच्या आवडीही तशाच खमंग आणि शौकीन आहेत.

‘‘डीनर डेटसाठी श्रेया बुगडे“ला विचारले तेव्हा दोन-तीनदा मुंबईत असतांना ठरवूनही आम्ही भेटू शकलो नाही. एक दिवस अचानक श्रेयाचा फोन आला की मी नागपूरला एका कार्यक्रमासाठी येते आहे तर आपण लंच सोबत घेऊ आणि गप्पाही मारु. आम्ही बरोबर एक वाजता हॉटेल अशोकामध्ये भेटलो आणि गप्पांना सुरुवात करण्याआधी ती म्हणाली की विष्णूजी मी बोलेन पण काही बनवू शकणार नाही. मी म्हटलं अग बनवायचं नाही फक्त खायचं आणि गप्पा मारायच्या आहेत.

पहिल्यांदा तर आमच्या “हवा येऊ द्या“ बद्दलच्या गप्पा सुरु झाल्या. हवा येऊ द्या श्रेया कुठल्याही भूमिकेला उत्तम न्याय देते. तिचा हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा असतो. तोच अनुभव मला तिच्याशी गप्पा मारताना जाणवला. तिने मेनू कार्ड पुढे आल्यावर ऑर्डर देण्यावरुन मला समजलं की ती फ्रचंड फुडी आहे आणि नॉनव्हेजफ्रेमीसुद्धा आहे. तिने आवडीने नॉनव्हेज जेवणाबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली. नॉनव्हेजमध्ये मासे, चिकन, मटण फ्रिय आहे. मटणाचे सगळे वेगवेगळे पार्ट्स एकत्र करुन ते वाटलेली खसखस, खोबरं याच्या मसाल्यात तयार केलेले सफेद मटण तिला आवडते. मुळात तिला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही आणि बनवितास़ुद्धा येत नाही हे तिने मोठय़ा मनाने कबुल केले. पण मी फार मोठी खवय्यी आहे हे ती लोकांना आवर्जून सांगते. जे छान स्वयंपाक करतात त्यांच्याकडे जाऊन जेवायला आवडते अशी ती म्हणाली.

एक मात्र खरं की, माझ्या ओळखीच्या घरामध्ये जिथे-जिथे चवीष्ट अन्न तयार होतं तिथे मी मुद्दाम फोन करुन सांगते आणि जेवायला जाते. तसं पाहिलं तरं सासरी सासुबाई आणि माहेरी आई ह्या दोघीही छान सुगरण आहेत आणि त्या ज्यावेळी हिला शिकवायला लागल्या त्यावेळी हिने स्पष्टपणे म्हटले की मला शिकवू नका मला स्वयंपाक करण्याचा फार कंटाळा येतो. पण आयतं खाल्ल्यानंतर बाकी आवर-सावर मी मात्र आनंदाने करते. बाहेर कधी जेवायला गेल्यानंतर एखाद्या अमुक पदार्थाचा ऑर्डर दिल्यानंतर त्याने तो पदार्थ बदलून आणला किंवा भलताच पदार्थ दिला तर मी ओळखू शकत नाही, पण चांगला असेल तर मात्र आनंदाने खाते. आता “हवा येऊ द्या“च्या निमित्ताने जेव्हा आम्ही वर्ल्ड टुर केली तेव्हा खूप धमाल आली. एकतर पदार्थांची नावं समजत नव्हती, काही पदार्थ असे होते जे कधी खाल्लेही नव्हते व पाहिले सुद्धा नव्हते. पण त्यानिमित्ताने जगातल्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीची ओळख झाली. याउलट माझा नवरा खाण्याचा शौकीन आहे आणि पुढे-मागे त्याचा प्लॅन आहे की, एक चांगलं नॉनव्हेजचं रेस्टॉरेंट काढावं. तिला जेव्हा म्हटंल की या ज्या फिल्मी पाटर्य़ा होतात त्यामध्ये तु जेवणाला किती महत्व देतेस. तर ती म्हणाली जास्तीत जास्त वेळा मी घरुनच जेवून जाते आणि तिथे गेल्यावर खूप वेगवेगळया भेटी आणि गप्पा होतात या कारणाने जेवणाकडे वेळ देणे शक्य होत नाही व बऱ्याच पाटर्य़ांमधून उपाशीच जाते. मला बेसिकली पार्टीतील जेवण आवडत नाही. त्यापेक्षा घरी येऊन पिठलं-भात खाल्लेला बरा.

सेटवर मात्र आम्ही कटाक्षाने जोशी काकूकडील जेवण मागवतो. त्या अगदी घरगुती पद्धतीने जेवण बनवून पाठवितात. घरी मी खूप कमी असते त्यामुळे लता मावशी आमच्याकडील अन्नपूर्णा आहे, रात्री शूटिंग असलं तर तिच्या हातचाच डबा घरून आणते. या गप्पांच्या ओघात जेवण कधी संपलं हे कळलचं नाही. आजूबाजूचे लोकं हळूहळू फोटो काढण्यासाठी सरसावत होते, मी म्हटलं श्रेया गोड काय मागवू, तर ती म्हणाला मला गोड मुळीच आवडतं नाही. पण कॅरेमल कस्टर्डसारखे फ्रकार आवडतात. तेव्हा मात्र मी तिला म्हटलं की आपण अगदी भिन्न आवडी-निवडीचे आहोत पण तरीही आपल्या गप्पा छान रंगल्या.

फ्रुट कस्टर्ड
साहित्य – अर्धी वाटी पपई, अर्धी वाटी अननस, अर्धी वाटी चिक्कू, अर्धी वाटी केळी, अर्धी वाटी दाक्षे, अर्धी वाटी स्ट्रॉबेरी, अर्धी वाटी कस्टर्ड पावडर, 5 वाटया दूध, 2 वाटया साखर, 1 वाटी आंब्याचे तुकडे.

कृती – सर्व फ्रथम सगळी फळे एकत्र करुन त्यात साखर मिसळून ठेवा. कस्टर्ड पावडरमध्ये दूध मिसळून मंद आचेवर घट्ट करुन घ्या. आवश्यकता पडल्यास जास्त दुधाचा वापर करु शकता. हे साधारण सॉससारखे घट्ट झाले पाहिजे. कस्टर्ड थंड करुन सर्व फळांमध्ये मिसळून फ्रीजमधे थंड करुन सर्व्ह करा.
टीप – अर्धी वाटी कॉर्नस्टार्च, पिवळा रंग पाव चमचा, अर्धा चमचा कस्टर्ड इसेंस एकत्र करुन कस्टर्ड पावडर बनवू शकतो.

कलेजी फ्राय

साहित्य – अर्धा किलो कलेजे, अर्धी वाटी ओलं खोबरं कोरडंच भाजून, अर्धी वाटी कोथिंबीर, 4 नग हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण, पुदीना पाव वाटी, अर्धा चमचा बडीशेप, मध्यम आकाराचे कांदे, अर्धा-अर्धा चमचा, दालचिनी, लवंग, काळी मिरी, 5-6 वेलदोडे, 1 चमचा कांदा-लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला, 3 नग टोमॅटो, अर्धी वाटी तेल, मीठ, हळद चवीनुसार.

कृती – कढईत तेल गरम करुन त्यात लवंग, दालचिनी तुकडा टाकावा. वाटलेला मसाला घालून परतावं. सुगंध सुटू लागल्यावर हळद घालावी. टोमॅटो बारीक चिरुन टाकावा. टोमॅटोची वाफ निघाल्यावर कलेजी टाकावी. चांगलं परतावं, गरमगरम पाव किंवा पोळीबरोबर खावी.

आपली प्रतिक्रिया द्या