गाताना शब्दाचा अर्थ गळ्यातून आला पाहिजे तरच त्या गाण्याला अर्थ – सुलोचना चव्हाण

207

सामना प्रतिनिधी । अलिबाग

‘नाव गाव कशाला पुसता, मला म्हणतात लवंगी मिरची’, ‘फड सांभाळ तुऱ्याला हा आला, तुझ्या उसाला लागलं कोल्हा’ या लावण्या ऐकल्या की समोर उभा राहतो तो ख्यातनाम लावणीसम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांचा. गाणी गाताना गाण्याचे शब्द कळले पाहिजे, त्याचे हाव भाव गाण्यात उतरले पाहिजे तरच गाणी ही उत्तम प्रकारे गायली जातात. असे परखड मत प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांनी मांडले आहे.

लावणीसम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण अलिबागमध्ये आपल्या कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या लावणी गायिकेबाबत, नवोदित गायकांबाबत आपले मत व्यक्त केले.

सुलोचना चव्हाण यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमुधुर आवाजाने अनेक गीते गायली आहेत. तर हिंदी नाटके, मेळावे यात लहान पणापासून कामे केली आहेत. मात्र त्याची खरी ओळख निर्माण झाली ती लावणी गाण्याने. तमाशा प्रधान सिनेमा म्हटलं की लावणी आली आणि ती गाणारी गायिका म्हणजे सुलोचना चव्हाण हे समीकरण ठरलेले.

रंगल्या रात्री अशा या सिनेमात वसंत पवार यांनी लिहिलेल्या “नाव गाव कशाला पुसता मला म्हणतात हो लवंगी मिरची” ही पहिली लावणी मी गायली आणि त्या गाण्याने मला शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर प्रत्येक तमाशा प्रधान मराठी सिनेमात लावणी गीत सादर केले. याआधी हिंदी सिनेमात गाणी गात होते. पण त्यानंतर मराठी सिनेमात मी गायला लागले असे सुलोचना चव्हाण यांनी सांगितले.

सुलोचना चव्हाण ह्या आज 85 वर्षाच्या झाल्या असून त्यांना ऐकू कमी येत आहे. मात्र लावणीतील गाण्याचा ठसका आजही त्याच आवाजात त्यांनी ऐकून दाखविला. आजही त्यांच्या आवाजात तीच जादू आहे. नव्या येणाऱ्या गायकांचा आवाज हा उत्तम आहे. मात्र गाणी गाताना त्या गाण्याचे शब्द आत्मसात करून गायल्यास गाणे उत्तम गायले जाते. अन्यथा त्याचा उपयोग होत नाही. असा सल्ला नवोदित गायकांना सुलोचना चव्हाण यांनी दिला आहे.

जुनी लावणी व आताची लावणी यात फरक आहे का याबाबत आपले काय मत आहे, याबाबत त्यांनी सांगितले की लावणीत फरक झालेला नाही, गाताना शब्दाचा अर्थ गळ्यातून आला पाहिजे, नुसतं सुरात गायलं म्हणजे गाणं होत नाही त्यात हावभाव आले पाहिजेत नाहीतर त्या लावणीत, भावगीताला काहीच अर्थ नाही, असे सुलोचनाताई शेवटी चव्हाण म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या