साहित्यविश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

खरेतर साहित्यविश्वाकडे निकोप दृष्टीने बघितले गेले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता एकमताने निवड करण्याच्या निर्णयाने ते साध्य होईल. निवडणुकीद्वारे हजारो लोकांचे मतदान ही प्रक्रिया मोठय़ा पातळीवर घेणे साहित्य संस्थांना अशक्य आहे. यासाठी वाया जाणारा लागणारा वेळ, निधी या अनावश्यक गोष्टी आहेत. म्हणूनच निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा आग्रह योग्यच आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यामागची पार्श्वभूमी कोणती आहे?
– मराठी साहित्य संमेलनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. आता हे संमेलन शतकाकडे वाटचाल करीत आहे. साहित्यक्षेत्रातील एकमेव असे संमेलन आहे जे दरवर्षी नियमितपणे होते. या संमेलनात विविध स्तरांवर अनेकांचा समावेश होत असताना संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत मात्र जेमतेम हजार-दोन हजार लोकांचाच समावेश असतो, ही बाब काहीशी नाराज करणारी होती. या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असतानाही निवडणूक प्रक्रियेमुळे मात्र अनेकजण यापासून लांब राहत. याबरोबरच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक साहित्य संस्थांनाही यात सहभागी होण्याची इच्छा होती. साहित्य संमेलनाच्या निकडणुकीमुळे अनेक ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले. अनेक साहित्यिकांनी निवडणूक प्रक्रियेपेक्षा सन्मानाने मिळणाऱया अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. याबरोबरच एकावेळी चार चांगले साहित्यिक, लेखक असताना त्यातून एकाला मत देऊन निवडणे हेही अवघडच होते. त्यातही काही क्लिष्टता वाटत होती. याबरोबरच असे करताना काही चांगले साहित्यिक संमेलनाध्यक्षपदाच्या पदापासून दूर राहत असल्याची खंतही होती. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. साहित्यासारख्या क्षेत्रात निवडणूक नको, एकमताने अध्यपद दिले जावे असाही मतप्रवाह जोर धरू लागला होता. त्यामुळे सध्याची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रद्द करून त्याऐकजी सर्वसंमतीने अध्यक्षांची निवड करण्याचे महामंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले. त्यासाठी साहित्य महामंडळाच्या घटनेतही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया यापुढे नेमकी कशी असणार आहे.
– घटनादुरुस्तीनंतर संमेलनाध्यक्षाची निवड ही एकमताने घेण्यात येईल. हे करताना महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील कार्यरत मराठी साहित्य संस्थांकडून इच्छुकांची नावे देण्यात येतील. यासाठी १०-१२ पर्याय देण्यात येतील प्रत्येक संस्था ३ नावे आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्था १ नाव असे पर्याय दिले जातील. यामुळे यात सर्व संस्थांना सहभागी होता येईल. याबाबत चर्चा केली जाईल आणि एक नाव एकमताने ठरवण्यात येईल. यात एखाद्या साहित्यिकाचे नाव फारसे प्रसिद्ध नसेल, परंतु त्यांचे लेखन वाखाणण्याजोगे असेल तर अशा साहित्यिकांना समाविष्ट होण्याचीही संधी मिळेल आणि असा साहित्यिक सर्वदूरपर्यंत पोहोचेल. येत्या संमेलनात मात्र हा निर्णय लागू होऊ शकणार नाही. त्यामुळे या वर्षी मात्र संमेलनाध्यक्ष निवडणुकीद्वारेच निवडले जातील.

या बदलाचे कोणते परिणाम जाणवण्याची शक्यता आहे?
– हा बदल करणे गरजेचे होते. कारण संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीवर अनेक वेगवेगळे आक्षेप येत होते. काही लोक चुकत आहेत, काही असंतुष्ट राहत आहेत. मतदानाचा गोंधळ होत आहे. या त्रुटी यामुळे साहित्य वर्तुळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत होता. वेगळ्या चर्चा घडत होत्या. हे सर्व टाळण्यासाठी हा बदल केला गेला. यातही अडचणी आल्या तर पुढे त्यानुसार बदल केला जाईल. ही अत्यंत पारदर्शक प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे यात कोणत्याही त्रुटी राहण्याची शक्यता नाही. संमेलनाध्यक्ष निवडीचा पाया हा बहुमताचाच राहील.

या निर्णयाच्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन तुम्हाला जाणवला?
– अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ किंवा याअंतर्गत काम करणाऱया साहित्य संस्था यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काहीसा पूर्वग्रहदूषित असल्याचे जाणवले. खरेतर या सगळ्या संस्था सेवाभावी वृत्तीने साहित्यसेवा करत असतात. स्थानिक पातळीवर साहित्य संस्था चालवतात. याअंतर्गत वाचक जागर उत्सव, वाचनालयातील कार्यक्रम, विविध कार्यशाळा, साहित्य चळवळी, मासिक स्थानिक पातळीवरील साहित्यिक कार्यक्रम असे विविध उपक्रम या संस्थांद्वारे चालवले जातात. यात कार्यरत असणारे साहित्यिक हे स्वेच्छेने हे काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. अखिल भारतीय महामंडळात काम करणाऱया या व्यक्ती लेखक, साहित्यिक आहेत व ते स्वतŠचे उपक्रम राबवत ही साहित्यसेवा करत असतात. त्यामुळे साहित्य संस्था वा साहित्य मंडळात काम करणाऱया व्यक्तींकडे त्याच दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. आपले अनेक व्याप सांभाळत प्रामाणिकपणे साहित्यसेवा करणारी ही सगळी माणसे आहेत. त्यांना राजकीय भूमिकेतून पाहणे चुकीचे आहे. यात विभागीय संस्था आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्था दोन्ही बरोबरीने साहित्यसेवा निभावत असतात. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांनी तर प्रतिकूल वातावरणातही मराठी साहित्याचे अनेक उपक्रम सुरू ठेवले आहेत. आपल्या भाषेसाठी साहित्यसंस्कृतीसाठी काम करणाऱया संस्थांच्या या योगदानाची दखल घेतली पाहिजे. त्या संस्था आहेत म्हणून संमेलने होत आहेत. साहित्यविश्वातील विचारांचे आदानप्रदान होत आहे. वैचारिक घुसळण होत आहे. हे आदानप्रदान साहित्याला वेगळी दिशा देत. संक्रमण घडवत. तेव्हा त्यांना सतत धारेवर न धरता काम करण्याची मोकळीक दिली गेली पाहिजे. गटातटाचे राजकारण करत साहित्यसेवा घडत नाही हेही यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

– [email protected]