IPL 2020 – दिल्लीचा बंगळुरूवर 6 विकेट्सने विजय, तरीही दोन्ही संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे दिल्लीने 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्ले ऑफमध्ये आता दिल्लीचा सामना पहिल्या स्थानावर असणाऱ्या मुंबई इंडियन्ससोबत होईल.

बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या. सलामीवीर देवदत्त पडीकल याने 50 धावांची खेळी केली. आयपीएल 2020 मधील पडीकलची हे पाचवे अर्धशतक होते.

पडीकलनंतर एबी. डिव्हीलिअर्स याने बंगळुरूचा डाव सावरला. त्याने 35 धावांची खेळी केली, तर दुबेने 17 आणि कोहलीने 25 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून नॉर्खयाने सर्वाधित 3, रबाडाने 2 बळी घेतले, तर आर. अश्विनने एक बळी घेतला.

खराब सुरुवात

153 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ 9 धावांवर बाद झाला. तेव्हा दिल्लीच्या फलकावर 19 धावा लागल्या होत्या.

रहाणे-धवनचे अर्धशतक

पृथ्वी बाद झाल्यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघात 88 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान दोघांनी अर्धशतक झळकावले. धवनने 54 आणि रहाणेने 60 धावा केल्या. यानंतर पंत आणि स्टोयनिसने दिल्लीला विजय मिळवून दिला.

केकेआरचे टेन्शन वाढले

या लढतीत दिल्ली विजयी झाली असली तरी बंगळुरूचा रनरेट केकेआरपेक्षा चांगला आहे. दोघांचे 14 गुण असले तरी बंगळुरूने रनरेटचया मदतीने प्ले ऑफ गाठली आहे. आता केकेआरचे लक्ष उद्याच्या मुंबई आणि हैद्राबादच्या लढतीवर असेल.

या लढतीत मुंबईने बाजी मारावी अशी प्रार्थना केकेआरला करावी लागेल. हैद्राबाद विजयी झाल्यास चांगल्या रनरेटच्या मदतीने वॉर्नरचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल, तर केकेआरला गाशा गुंडाळून माघारी यावे लागेल.