लखनौ आज चेन्नईच्या बालेकिल्ल्यात भिडणार

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला लखनौ सुपरजायंट्सने मागील लढतीत आपल्या घरच्या मैदानावर धूळ चारली होती. मात्र आता चेन्नईचा संघ आपल्या बालेकिल्ल्यात अर्थात चेन्नईमध्ये लखनौची दाणादाण उडविण्यासाठी अतूर झाला आहे. उभय संघांनी सातपैकी 4-4 लढती जिंकलेल्या असल्याने गुणतालिकेतील रस्सीखेचीसाठीही ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मागील आठवडय़ात कर्णधार लोकेश राहुल व क्विंटन डिकॉक यांच्या विक्रमी सलामीच्या जोरावर लखनौने चेन्नईचा सहज पराभव केला होता. मात्र चेन्नईच्या पुढील तीन लढती या होम ग्राऊंडवर होणार आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यातील सर्व लढती जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी चेन्नई सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड व शिवम दुबे चेन्नईसाठी धावा करत आहेत. मात्र गतसामन्यात अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवून ऋतुराज तिसऱया क्रमांकावर खेळला होता. सलामीवीर रचिन रवींद्रचा हरवलेला सूर ही चेन्नईसाठी चिंतेची बाब होय. आघाडीच्या फळीने चांगली सुरुवात करून दिल्यास रवींद्र जाडेजा, मोईन अली व महेंद्रसिंग धोनी यांना खाली मनमोकळी फटकेबाजी करता येते. चेन्नईसाठी मथिषा पथिराना सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे. मात्र दीपक चहर, तुषार देशपांडे व मुस्तफिजूर रहमान यांनाही आता प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यासाठी टिच्चून मारा करावा लागणार आहे. लखनौसाठी राहुल व डिकॉक यांच्यावर धावा करण्याची जबाबदारी असेल. निकोलस पुरनने संकटमोचकाची भूमिका चोखपणे बजावलेली आहे. वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून सावरला, तर मग लखनौचे टेन्शन थोडे कमी होईल.