दाम बडे अन् प्रदर्शन छोटे; आयपीएलचे महागडे खेळाडू ठरताहेत संघासाठी महागडे

आयपीएलमध्ये सर्वात मोठी रक्कम मोजून घेतलेले खेळाडू फ्रेंचायझीजसाठी खूपच महागडे ठरताहेत. दिग्गजांवर लावलेला पैसा चक्क वाया जात असल्याचे पाहून संघमालक दुःखी झाले आहेत. त्यांची कामगिरी पाहून त्यांना संघाबाहेर बसवण्याची नामुष्की संघावर आल्याचे दिसतेय.

यंदाच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन वर्ल्ड चॅम्पियन्सच्या खेळाडूंचा बोलबाला होता. आयपीएलच्या फ्रेंचायझींनी या वर्ल्ड चॅम्पना संघात घेताना कोटीच्या कोटी रुपयांची उधळण केली होती. पण प्रत्यक्षात त्यांनी लावलेला पैसा लंगडय़ा घोडय़ावर लावल्याचे त्यांना भासू लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कचेच घ्या. त्याला 24.75 कोटी रुपये मोजून कोलकात्याने घेतले तेव्हा हिंदुस्थानी क्रिकेट क्षेत्रात खळबळ माजली होती. आजवरची ही सर्वात मोठी रक्कम होती. त्यामुळे या बिग बजेट खेळाडूकडून कोलकात्याला फार मोठी अपेक्षा होती, पण तो अक्षरशः फ्लॉप ठरला आहे. मोठा गोलंदाज असल्यामुळे कोलकात्याने त्याला आतापर्यंत सर्वच्या सर्व सातही सामने खेळविले आहेत. मात्र या स्टार गोलंदाजाला केवळ सहाच विकेट मिळवण्यात यश मिळाले आहे. तेसुद्धा 48च्या सरासरीने. त्याच्याइतका अपयशी पूर्ण आयपीएलमध्ये कुणी ठरलेला नाही.

वेस्ट इंडियन अल्जारी जोसेफ, रोवमन पॉवेल यांच्यासाठी दहा कोटींची बोली लावण्यात आली. मात्र अद्याप या खेळाडूंना आपली चमक दाखवता आलेली नाही. हीच स्थिती गेल्या आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू पॅमरून ग्रीनबाबत आहे. अष्टपैलू ग्रीन ना फलंदाजीत आपले फटके दाखवू शकला ना गोलंदाजीची धार. त्याची कामगिरी अतिसामान्य झाल्यामुळे बंगळुरूसाठी हा खेळाडू खूपच महागडा ठरला आहे. स्पेन्सर जॉन्सन या युवा वेगवान गोलंदाजावर गुजरातने दहा कोटींचा जुगार खेळला होता, जो ते हरले आहेत. या खेळाडूला पाच सामन्यांत संधी दिली, पण त्याला संधीचे सोनेच करता आलेले नाही. त्याला फक्त चार विकेट टिपता आल्यात. चेन्नईचा डॅरिल मिचेल हासुद्धा अद्याप फार चांगला खेळू शकलेला नाही. त्याला सहा सामन्यांत फलंदाजाची संधी मिळाली, पण त्याच्या बॅटीतून एकही अर्धशतकी खेळी अद्याप ठोकता आलेली नाही. अपयशी खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचेच स्टार आघाडीवर असून ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नर या महागडय़ा खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वांचीच घोर निराशा केली आहे. आपला अपयशी खेळ पाहून मॅक्सवेलने स्वतःहूनच माघार घेतली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये विदेशीच नव्हे तर देशी महागडय़ा खेळाडूंचीही यादी मोठी आहे. जे आयपीएलचा अर्धा टप्पा झाल्यानंतरही आपला खेळ दाखवू शकले नाहीत. यात हार्दिक पंडया टॉपवर आहे. हा महागडा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी काहीच करू शकलेला नाही. मात्र एकीकडे काही 20 लाखांत संधी मिळालेल्या खेळाडूंनी धक्कादायक कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.