आयपीएल खेळाडूंना जीपीएस टॅगिंग, बायो-बबल तोडल्यास आता लगेच कळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने नियमावली आणखी कठीण केली आहे. आयपीएलमधील प्रत्येक खेळाडूंना जीपीएस टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे बायो-बबलच्या बाहेर गेलेला खेळाडू लगेच कळणार आहे. ‘आयपीएल’ स्पर्धा निर्विघ्न पार पडावी यासाठी ‘बीसीसीआय’कडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

खेळाडूंना अलर्ट राहण्यास मदत

खेळाडूंनी बायो-बबलच्या बाहेर जाऊ नये यासाठी त्यांना ट्रकिंग डिवाइस दिले जाणार आहे. हे डिवाइस रिस्ट बॅण्ड किंवा चेनच्या स्वरूपात असतील. खेळाडूंना हे डिवाइस रिस्ट बॅण्ड किंवा चेन घालूनच हॉटेलच्या बाहेर जाता येईल. बायो-बबलची लक्ष्मणरेषा न ओलांडण्यासाठी या जीपीएस डिवाइसची मदत होणार आहे. कारण लक्ष्मणरेषा ओलांडताच ही सिस्टम अलर्ट करणार आहे.

…तर 7 दिवस क्वारंटाइन

जीपीएस डिवाइसमुळे प्रत्येक खेळाडूवर लक्ष देणे सहज शक्य होणार आहे. शिवाय प्रत्येक ‘आयपीएल’ संघासोबत चार कोरोना अधिकारीही असणार आहेत. त्यामुळे बायो-बबलचे उल्लंघन केल्यास खेळाडूंना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर कोरोना चाचणी होऊन ती निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा बायो-बबलमध्ये प्रवेश मिळेल.

हॉटेल कर्मचाऱयांसह ड्रायव्हरही क्वारंटाइन

‘आयपीएल’ स्पर्धेतील खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत त्या हॉटेलमधील कर्मचारी, खेळाडूंसाठी असलेल्या बसचे ड्रायव्हर या सर्वांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या कोरोना चाचण्याही होणार आहेत. हे सर्व कर्मचारी आणि ड्रायव्हर यांनाही बायो-बबलचे नियम लागू असतील. यातील कोणालाच स्पर्धा संपेपर्यंत घरी जाता येणार नाही.