अमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा

32

सामना ऑनलाईन । तेहरान

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष विकोपाला पोहचला असतानाच इराणच्या एका दाव्याने या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. अमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना अटक करून त्यांच्यापैकी काही जणांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा दावा इराणने सोमवारी केला आहे. हे गुप्तहेर अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएसाठी काम करत होते, असे इराणने स्पष्ट केले आहे. मात्र, इराणच्या या दाव्याबाबत अमेरिका किंवा सीआयएने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणच्या गुप्तहेर मंत्रालयाकडून हा दावा करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले गुप्तहेर इराणमधील संवेदनशील ठिकाणी, खासगी आर्थिक संस्था, सैन्य आणि सायबर क्षेत्रात काम करून महत्त्वाची आणि गोपनीय माहिती सीआयएला पुरवत होते, असा दावाही इराणकडून करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. सरकारी वाहिनीवर प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तात या गुप्तहेरांपैकी काहीजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे म्हटले आहे. इराणच्या या भूमिकेमुळे इराण आणि अमेरिकेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशातील तणाव वाढल्यास युद्ध किंवा अणुयुद्धाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आखाती देशातून तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले इराण घडवत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. मात्र, इराणने या आरोपांचे खंडण केले आहे. इराणने नुकतेच एक ब्रिटिश जहाज ताब्यात घेतले आहे. याचे प्रत्युत्तर देण्याचा इशारा ब्रिटनने दिला आहे. आखाती देशातील वाढता तणाव लक्षात घेता अमेरिकेने एअरक्राफ्ट कॅरिअर आणि सैन्याची अतिरिक्त तुकडीही तैनात केली आहे.

इराणसह असलेल्या अणुसहकार्य करारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढायला सुरूवात झाली होती. तेव्हा अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंधही लादले होते. गेल्या महिन्यात इराणने अमेरिकेचे अद्ययावत ड्रोन पाडल्यानंतर हा तणाव शिगेला पोहचला आहे. अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद संपवावा अशी मागणी इराणने अणुसहकार्य करारात सहभागी असलेल्या युरोपीय देशांकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या