वीज चमकत असताना फोनचा फ्लॅश वापरला तर काय होतं? वाचा सविस्तर

सध्या पावसाळी वातावरण आहे. पावसाळ्यात पसरलेली हिरवाई, थेंबांची टपटप या सगळ्यांचा फोटो काढण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. प्रोफेशनल कॅमेरा नसल्याने बऱ्याचदा फोन कॅमेऱ्याचा वापर करून फोटो काढले जातात. पण अशावेळी फ्लॅश सुरू ठेवावा का, असा प्रश्न बहुतेकांना पडतो.

याचं कारण अगदी उघड आहे. पावसाळ्यात ढग गडगडत असतील तर वीज देखील चमकत असते. फ्लॅशमुळे वीज ओढली जाण्याची भीती अनेकांना वाटते. त्यामुळे अनेकजण फ्लॅश सुरू न करताच फोटो काढतात. पण, वीज चमकत असताना फ्लॅश सुरू ठेवला तरी हरकत नाही, असं उत्तर कोरा या संकेतस्थळावर दिलेल्या उत्तरात सांगण्यात आलं आहे.

पण, वीज चमकत असताना फ्लॅश वापरला तर विद्युत उर्जा त्यातून प्रवाहित होत नाही. सर्वसाधारणतः प्रकाशामुळे हवा आयोनाईज झाली तर त्यातून विद्युत प्रवाह जाऊ शकतो. पण, त्यासाठी अतिनील किरणे किंवा खूप जास्त प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करणारा बल्ब लागतो. आपल्या घरगुती वापरातले बल्ब देखील इतके शक्तिशाली नसतात की त्यातून विद्युत उर्जा प्रवाहित होईल.

सध्याच्या काळात जे फ्लॅश फोनमध्ये असतात, ते बहुतांश एलईडी असतात. त्यात खूपच कमी व्होल्टेजचा वापर केला जातो. प्रकाश फोटॉन कणांपासून बनलेला असतो, त्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह वाहून नेऊ शकत नाही अथवा हवा आयोनाईज करत नाही. म्हणजेच फोटो फ्लॅश किंवा कॅमेरा फ्लॅश कोणतेही विद्युत करंट प्रवाहित करत नसल्यामुळे शॉक लागण्याचा धोका नसतो.

आपली प्रतिक्रिया द्या