
इस्रायल आणि हमास यांच्यात अद्यापही युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केला होता ज्यानंतर इस्रायलने हमासला समूळ नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. हे युद्ध सुरू असताना इस्रायल विरूद्द पॅलेस्टाईन संघर्षाचे पडसाद युरोपातील काही देशांमध्ये पाहायला मिळाले. इंग्लंडमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. इंग्लंडने इस्रायलला पाठिंबा दिला असून इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक स्वत: इस्रायलला जाऊन तिथले पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूंना भेटले होते. सुनक यांनी पॅलेस्टाईन समर्थकांना इशारा दिला आहे. जिहादी घोषणा दिल्यात तर खबरदार असा इशारा सुनक यांनी दिला आहे.
सोमवारी, सुनक यांनी ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की ‘या आठवड्यात आम्ही आमच्या रस्त्यावर द्वेष पाहिला. जिहादसाठी आवाहन करणे केवळ ज्यू समुदायासाठीच नाही तर आपल्या लोकशाही मूल्यांसाठीही धोकादायक आहे. आम्ही आमच्या देशात ज्यूविरोध खपवून घेणार नाही. आम्हाला आशा आहे की, पोलीस अशा उपद्रवी लोकांवर नक्की कारवाई करतील.
द्वेषपूर्ण भावना उत्तेजित करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्यांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही सुनक यांनी बजावले आहे. शनिवारी मध्य लंडनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आल्याचे वृत्त आहे. सुमारे एक लाख लोक इथे जमले होते आणि त्यांनी जिहादी घोषणा दिल्याचे सांगण्यात येत आहे. ‘जिहाद’च्या घोषणा देणाऱ्यांना अटक न केल्याबद्दल पोलिस अधिकारी सर मार्क रॉली यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
इंग्लंडचा इस्रायलला पाठिंबा
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा आणि इटलीच्या नेत्यांनी इस्रायलच्या पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासपासून स्वरक्षणासाठी उचललेल्या पावलाचे समर्थन केले आहे. तथापि, त्याने इस्रायलने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री बाळगण्याचे आवाहनही केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर व्हाईट हाऊसने रविवारी संयुक्त निवेदन जारी केले होते.






















































