
युद्धविरामानंतर इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा युद्ध सुरु झाले आहे. या दरम्यान इस्रायलने लेबनानची माफी मागितली आहे. चहूबाजूने इस्रायलवर टीका झाल्यानंतर त्यांनी लेबनानची माफी मागितली आहे. नेमके काय झाले ज्यामुळे इस्रायलने लेबनानची माफी मागितली आहे हे जाणून घेऊया.
इस्रायलने हिजबुल्लावर केलेल्या हल्ल्यात लेबनानचा एक जवान मारला गेला. हिजबुल्लावर हल्ला करताना इस्रायलने लेबनानची चौकी उडवली. त्यामुळे इस्रायलवर चहूबाजूने टीका होऊ लागली. आता आयडीएफने आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांचे लक्ष्य हिजबुल्लाह होते. मात्र या हल्ल्यामध्ये लेबनानचा सैनिक मारला गेला. आयडीएफ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेला शस्त्रविराम संपला असून पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. असोसिएटेड प्रेसने वॉशिंग्टनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँकमधील हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर अमेरिकेने व्हिसा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
अमेरीका, कतार आणि इजिप्त यांनी याआधी इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात मध्यस्थी केली होती. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 16,000 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, तर गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी तीन चतुर्थांशहून अधिक लोकांनी पलायन केले आहेत.
इस्रायली संरक्षण दल आयडीएफने बुधवारी हल्ल्यादरम्यान लेबनानच्या सैनिकाच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला आहे. इस्रायल लष्कराच्या म्हणण्यानुसार, सीमेवर हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या लपण्याचे ठिकाण त्यांना कळाले होते, त्यामुळे त्यांनी हल्ला केला होता. आपल्याला लेबनानच्या सैनिकाला मारायचे नव्हते, आपल्याला या घटनेचा पश्चाताप होत असून त्याची चौकशी केली जाईल असे इस्रायलतर्फे सांगण्यात आले आहे.

























































