
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) कोरोना काळातील आपले पहिले मिशन फत्ते करीत पुन्हा एकदा आपल्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्त्रोने शनिवारी पीएसएलव्ही सी – 49 क्षेपणास्त्राचे लाँचिंग करीत शत्रूंना कडक इशारा दिला आहे. या क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातदेखील पृथ्वीवरील छायाचित्र घेऊ शकता येणार आहेत.
इतकेच नव्हे तर या क्षेपणास्त्राच्या सिंथेटिक अपरचरमुळे ढगाळ वातावरणातदेखील छायाचित्र घेणे सहज सोपं होणार आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे हिंदुस्थान अधिक ताकदवर झाला आहे.
इस्रोने शुक्रवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून ही चाचणी केली. यावेळी इस्त्रोने पीएसएलव्ही सी – 49 क्षेपणास्त्रासह 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) यशस्वी लाँचिंग केले. दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी याचे लॉचिंग होणार होते. मात्र त्यात सुधारणा करुन 3 वाजून 12 मिनिटांनी ही चाचणी पूर्ण करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या मदतीने भर दिवसाच्या आणि रात्रीच्या अंधारात देखील छायाचित्र घेता येणार आहे.
त्याशिवाय सैन्य दलाला आकाशातून सीमा रेषेवर लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे. त्याशिवाय आपत्तकालीन व्यवस्थेसाठी देखील या क्षेपणास्त्राचा वापर करता येणार आहे. याचबरोबर कृषी क्षेत्रात देखील त्याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कामगिरीबद्दल इस्त्राचे अभिनंदन केले आहे. या वर्षांतील इस्त्रोचे हे पहिली लॉचिंग होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. याआधी इस्त्रोने 17 जानेवारी रोजी जीसॅटची देखील यशस्वी चाचणी फ्रेंच गुयाना येथे पूर्ण केली होती.
आजच्या यशस्वी चाचणी बद्दल बोलताना इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान म्हणाले की, दिवाळीच्या अगोदरच आपण रॉकेट लाँच केला आहे. त्यामुळे आताच जल्लोष सुरु झाला आहे. अंतराळाशी निगडीत कोणतेही काम आम्ही वर्क फ्रार्म होमच्या माध्यमातून करु शकत नाही. त्यासाठी आमचा प्रत्येक अभियंता हा प्रयोगशाळेत उपस्थित असतो. आम्ही कोणत्याही मिशनबद्दल चर्चा करतो, त्यावेळी आमचा प्रत्येक व्यक्ती एकत्र येऊन काम करत असतो, असे ते म्हणाले.
इस्त्रोचे 51 वे मिशन
इस्रोचे हे 51 वे मिशन होते. या प्रक्षेपणाचे लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूटय़ुब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आले होते.
पीएसएलव्ही सी 50 देखील लवकरच
इस्त्रोने पीएसएलव्ही सी 49 यशस्वी चाचणी केल्यानंतर आता सर्वांच्या नजरा पीएसएलव्ही सी 50 वर लागून राहिले आहे. हे क्षेपणास्त्र देखील डिसेंबरमध्ये लाँच करण्याची योजना आहे. आजच्या प्रक्षेपणानंतर पुढच्या तयारीसाठी सुमारे 30 दिवस आहेत, अशी माहिती विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक एस सोमनाथ यांनी दिली.

























































