गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न जैसे थे; 25 जुलैला विधान भवनावर धडक मोर्चा, कामगार कृती संघटनेचा निर्धार

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून आश्वासनांशिवाय राज्य सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. आतापर्यंत झालेल्या चार सोडतीत सुमारे 16 हजार कामगारांना घरे मिळाली असून घरांसाठी अर्ज केलेले 1 लाख 75 हजार आजही घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता याप्रश्नी येत्या पावसाळी अधिवेशनात थेट विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय गिरणी कामगार संघटना कृती समितीने घेतला आहे. मोर्चाद्वारे घरांसाठी प्रस्तावित 110 एकर जमीन लवकरात लवकर म्हाडा कडे सुपूर्द करावी, सिडकोने खारघर येथील घरे गिरणी कामगारांना देण्यास मान्यता द्यावी, या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

कामगार कृती संघटनेच्या जयश्री खाडिलकर-पांडे, गोविंद मोहिते, जयप्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, प्रवीण घाग, नंदू पारकर, प्रवीण येरुणकर, बजरंग चव्हाण, बबन गावडे, जितेंद्र राणे, सुनील बोरकर, साई निकम इत्यादी कामगार नेत्यांची मजदूर मंझीलमध्ये नुकतीच सभा पार पडली. या सभेत 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गिरणी कामगार संघटना कृती समितीचे नेते, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी स्पष्ट केले. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या प्रमुख सहकार्यामुळे मार्गी लगला. पण सह्याद्री येथील चावी वाटप कार्यक्रमाला त्यांना कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही देण्यात आलेले नाही, असा आरोपही मोहिते यांनी केला.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागेची उपलब्धता कमी आणि मागणी मात्र मोठी हे विषम प्रमाण कमी करण्यासाठी गिरणी कामगार कृती समितीने वरीलप्रमाणे मागण्या लावून धरल्या आहेत, असेही गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे. गिरणी कामगार कृती समितीत सहा कामगार संघटना एकत्र येऊन लढा देत आहेत.