
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून काकाने पुतण्याच्या डोक्यावर फावड्याने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कौतिकराव आनंदा गावंडे असे मृत्युमुखी पडलेल्या पुतण्याचे नाव आहे.
या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा गावंडे (37) यांच्या डोक्यावर फावडयाचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्या अवस्थेतही ते मोटारसायकलवरून अवस्थेत भोकरदन पोलिस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिल्लोड येथे पुढील उपचारासाठी पाठविले होते. उपचार करून पुन्हा भोकरदनला येऊन त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
त्यानंतर काही वेळाने जखमी कौतिकराव गावंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात येत असतांना मध्यरात्री दीड वाजता त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. फिर्यादीचा मृत्यु झाल्याचे कळताच पोलिसांनी रात्रीतून तपास चक्रे फिरवून आरोपी चुलते सुखदेव सारजूबा गावंडे, चुलत भाऊ सुधाकर गावंडे आणि परमेश्वर गावंडे यांना ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजाराम तडवी, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोहेकाँ. सूर्यकांत केंद्रे, पोना. रुस्तुम जैवळ, पोकाँ. अभिजित वायकोस, राहुल घुले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली आहे.































































