जळगाव अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jalgaon-accident

32 व्या रस्ते सुरक्षा अभियानाची सांगता दोन दिवसांवर आली असतानाच जळगाव येथे पपईचा ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात 16 जण ठार झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

जळगाव जिह्यातील अपघातातील टाटा मोटर्स गुड्स कॅरीअर वाहनाचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेला आहे. या वाहनाची नोंदणी 9 डिसेंबर 2010ची असून ते रावेरी इमामवाडा येथील शेख फय्यद यांच्या नावे आहे. वाहनाच्या फिटनेसच्या प्रमाणपत्राची मुदत 18 नोव्हेंबर 2021पर्यंतचे आहे. अशा मालवाहू वाहनात कायद्याने चालकाशिवाय केवळ तीन जणांना परवानगी आहे. या गाडीत 22 जण प्रवास करीत होते. पपईच्या भाराने इतकी मनुष्यहानी होणे कठीण असून त्यामुळे नेमका अपघात कसा झाला? हे मजूर आधीपासूनच गाडीत होते की त्याने रस्त्यात प्रवासी गाडीत घेतले या सर्व बाबींची चौकशी करण्यात येऊन मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.