
सामना प्रतिनिधी। जळगाव
भरधाव वेगात वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरने पुन्हा एक निष्पाप बळी घेतला आहे. बुधवारी दुपारी अजिंक्य चौफुलीजवळ डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका जवानाचा मृत्यू झाला आहे. सुरेश लोटन मराठे ( ४५) असे या जवानाचे नाव आहे. ते लष्करातून निवृत्त झाले होते.
निवृत्ती नंतर ते जळगावात एसटी वर्कशॉपमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. मराठे यांना बुधवारी सुटी असल्याने मित्रांना भेटायला गेले होते. मित्रांची भेट घेतल्यानंतर ते मटन घेऊन दुचाकी क्रमांक एम.एच. १८ एक्स ३३६२ वरून घरी परतत होते. लढ्ढा फॉर्मजवळून जात असतांना भुसावळकडून भरधाव वेगात येणाऱ्या डंपर क्रमांक एम.एच. १२ सीटी ८२७१ ने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात ते दूरवर फेकले गेले व डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक या घटनेनंतर पसार झाला. त्यानंतर मराठे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या मुळगावी थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावारण निर्माण झाले होते.
मनमिळावू स्वभावाचे मराठे
सुरेश मराठे हे अत्यंत मनमिळावून स्वभावाचे होते. अल्पावधीतच त्यांनी मित्रांची संख्या वाढवली होती. अर्ध्या तासापूर्वीच ते आमच्याशी चर्चा करुन निघाले होते आणि अर्ध्या तासातच त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर आल्याने आम्ही निःशब्द झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यानी सांगितले.
























































