
उचल घेऊनही ऊसतोड मुकादम टोळी घेऊन ऊसतोडीला आलाच नाही. उचल न फेडताच मुकादमाने पळ काढला. घेतलेली उचल परत केली नाही. त्यामुळे टोळीमालकाने मुकादमास घरी जाण्यास मज्जाव केला, अशा अनेक बातम्या किंवा चर्चा आपण आजपर्यंत ऐकल्या असतील. मात्र, परजिह्यातील एखाद्या मुकादमानेच इथल्या टोळीमालकाला त्याच्या गावाकडे येऊन पळवून नेले तर…? प्रत्येकाला प्रश्न पडेल की असे कुठे होऊ शकते का? पण असा प्रकार कर्जत तालुक्यातील एका गावात घडला असून, अपहरण केलेल्या या टोळीमालकाची सुखरूप सुटका कर्जत पोलिसांनी केली आहे.
त्याचे झाले असे, कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावातील टोळीमालक सुभाष बापू ठोंबरे (वय 41) हे आणि डोळे मुकादम आणि काही कामगार सोबत होते. अचानक ऊसतोडणी पैशांच्या कारणावरून टोळी मुकादम उपेंद्र दिलीप मोरे (रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने चक्क टोळीमालकाला पळवून नेल्याची घटना 26 मे रोजी दुपारी घडली होती.
अपहरण झालेल्या टोळीमालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात त्याचदिवशी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जत पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सुभाष ठोंबरे हे सुरुवातीला नेवासा व नंतर पिंपरखेड (ता. चाळीसगाव) येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी तत्काळ पोलीस ठाण्यातील पोलीस पथक रवाना करून तेथील स्थानिक पोलीस निरीक्षक संजय मेंढे व गावातील प्रतिष्ठत व्यक्तींच्या मदतीने ठोंबरे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी पळून गेले. त्यानंतर कर्जत पोलिसांनी ठोंबरे यांना कर्जत येथे आणून नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात दिले.
कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलीस नाईक संभाजी वाबळे, कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, अर्जुन पोकळे, देविदास पळसे, संपत शिंदे यांनी केली असून, पोलीस नाईक संभाजी वाबळे तपास करीत आहेत.




























































