शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे जागर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळकोट

अतिवृष्टी नुकसान भरपाईतून वगळलेल्या जळकोट तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जळकोट तालुका शिवसेनेच्या वतीने जळकोटच्या तहसील कार्यालयासमोर जागर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

जळकोट तालुक्यातील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा 17 जानेवारीच्या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार आज हे जागर आंदोलन तालुक्यातील असंख्य शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. रामचंद्र आदावळे, संगमेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

2016 मधील अल्पभूधारक वगळलेल्या शेतकऱ्यांना व बहुभूधारक सर्व शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. अवैधरीत्या चालू असलेली वाळू तस्करी बंद करावी, विद्यार्थ्यांची सर्व फी माफ करावी, रब्बी हंगामातील वगळलेली गावे व राहिलेले शेतकरी यांना तात्काळ विमा द्यावा, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे, गुडसूर ते बोरगाव (खुर्द) रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आठ दिवसांत या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. रामचंद्र आदावळे, संगमेश्वर टाले, शेखर डोंगरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून धीर दिला.