जालन्यात शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू, कार जळालेल्या स्थितीत आढळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना तालुक्यातील सेवली-नागापूर या आडमार्गावरील दरीत जळालेल्या कारमध्ये पुरुष जातीचा हाडांचा सापळा सोमवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आला. घटनास्थळी सापडलेल्या पाकिटामधील कागदपत्रावरुन हा मृतदेह शिवसैनिक रमेश शेळके (रा. पोहेगाव ता. जालना) यांचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांना घटनास्थळी काही दगडांवर व रुमालावर रक्ताचे डाग असल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह शिवसैनिकांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच परतूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी इंदलसिंग बहुरे, सेवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे, मंठा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन गुड्डेवार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, फिंगर प्रिंट पथक, डॉग स्कॉड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा चालकाच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत आहे. चालकाच्या सीटवर जळालेल्या सांगाड्याचे डोके, तर चालक सीटच्या बाजुला असलेल्या सीटच्या दिशेला पाय असल्याचे दिसून आले आहे. या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.