जेम्स बॉण्ड गेला! ज्येष्ठ अभिनेते शॉन कॉनेरी यांनी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉन्डपटात ‘जेम्स बॉन्ड’ची भूमिका अजरामर करणारे, जगभरातील सिनेरसिकांच्या मनात आपला ठसा उमटवणारे विख्यात अभिनेते शॉन कॉनेरी यांनी आज 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कॉनेरी यांनी अनेक चित्रपटात काम केले. मात्र, त्यांनी साकारलेल्या रुबाबदार जेम्स बॉन्डने चाहत्यांच्या हृदयात आदराचे स्थान मिळविले. हॉलिवूडमध्ये बॉन्ड साकारणारे ते पहिले अभिनेते होते. बॉन्ड म्हणजेच शॉन हे समीकरण अतुट राहिले. त्यांच्या निधनाने जगभरातील रसिक हळहळले.

एडिनबर्गच्या झोपडपट्टीत जन्मलेले शॉन कॉनेरी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट होती. त्यामुळे लहानपणी शाळा सोडून त्यांना मजूरी करावी लागली होती. वयात आले तेव्हा रॉयल नेव्हीमध्ये नोकरी मिळाली पण अल्सरचा आजार अचानक उद्भवल्याने त्यांना नेव्हीतून काढून टाकले गेले. उंचपुरी देहयष्टी, आकर्षक व रुबाबदार व्यक्तीमत्व असल्याने शॉन यांनी 1950 मध्ये ‘मिस्टर युनिव्हर्स’ स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

1962 मध्ये पुस्तकातून पडद्यावर आलेला जेम्स बॉन्ड शॉन यांच्या रुपाने लोकांनी पाहिला आणि पुस्तकात वर्णन असलेला हा तोच बॉन्ड आहे अशी त्यांची ख्याती बनली. शॉन यांनी साकारलेल्या बॉन्डला दर्शकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पहिलेच पाच बॉन्डपड ब्लॉकबस्टर झाले आणि त्या यशाचे खरे श्रेय शॉन यांनाच जाते. त्यावेळी त्यांना 30 हजार डॉलर इतके मानधन मिळत होते.

‘फ्रॉम रशिया विद लव्ह’, ‘गोल्डफिंगर’, ‘थंडरबॉल’, ‘यूओन्ली लाइव्ह ट्वॉईस’, ‘डायमंड आर फॉरेव्हर’, ‘नेव्हर सेनेव्हर अगेन’ या बॉन्डपटांनी शॉन यांना जगाच्या कानाकोपऱयात पोहोचवले. सिनेकारकिर्दीत त्यांचा ऑस्कर पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. प्रतिष्ठsचे तीन ‘गोल्डन ग्लोब’ आणि दोन ‘बाफ्ता’ पुरस्कारही त्यांना मिळाले होते.

असा लिजंड होणे दुर्मिळ

शॉन कॉनेरी हे परफेक्ट बॉन्ड होते. जगभरातील सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजविले. असा करिश्मा असलेला लिजंड होणे दुर्मिळ आहे. शॉन कॉनेरी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे, अशा भावना गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अभिषेक बच्चन यांच्यासह अनेकांनी शॉन कॉनेरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.