फायरबॉल बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोन कामगार ठार, दोन जखमी; जामखेडमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

जामखेडमध्ये मोठय़ा इमारतीत वापरण्यात येणारी स्वयंचलित अग्निशमन उपकरणे (फायरबॉल) तयार करणाऱया कारखान्यात स्फोट होऊन आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ज्ञानेश्वर चंद्रकांत भोंडवे (वय 45, रा. घोडेगाव, ता. जामखेड) व झहीर सत्तार मुलानी (वय 35, रा. तेरखेडा, ता. कळंब) अशी मृतांची नावे आहेत.

जामखेड शहरातील नगर रोडवर पंकज शेळके यांच्या मालकीचा रेडमॅटिक ऑटोमॅटिक फायर फायटर हा कारखाना आहे. सुमारे दोन वर्षांपासून तेथे अग्मिशमन साधने तयार केली जातात. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास कामगार ज्ञानेश्वर भोंडवे व झहीर मुलानी हे दोघे काम करीत होते. इतर दोघे कारखान्याच्या बाजूला थांबलेले होते. त्यावेळी अचानक कारखान्यात स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की, त्या इमारतीच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. त्यातून धुराचे मोठे लोट बाहेर आले. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत बाहेर आले. मात्र, धुराचे लोट प्रचंड होते. शिवाय आतमध्ये अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. त्यामुळे जवळ जाता येत नव्हते.

दरम्यान, या घटनेची माहिती जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर आतमध्ये जाऊन पाहिले असता, दोन कामगार मृतावस्थेत आढळून आले. यावेळी कारखान्याच्या बाजूस असलेले गणेश पवार यांच्यासह एकजण जखमी झाला. या घटनेची नेंद जामखेड पोलिसांत करण्यात आली आहे.