
सामना ऑनलाईन, सरांस्क
स्टार खेळाडू जेम्स रॉड्रिगेझ दुखापतीमुळे बाहेरच… तिसऱ्याच मिनिटाला कार्लोस सांचेझला रेड कार्ड… अन् त्यानंतर दहा खेळाडूंसह उर्वरित सामना खेळण्याची आपत्ती… या सर्व घटनांचा परिणाम कोलंबियाच्या संघावर मंगळवारी झाला. मात्र जपान संघाने आपली चमक दाखवत कोलंबियाला २-१ अशा फरकाने हरवले आणि फिफा वर्ल्ड कपमधील ‘एच’ गटात महत्त्वाच्या तीन गुणांची कमाई केली. याप्रसंगी आशिया खंडातील संघाने दक्षिण अमेरिकेतील संघावर वर्ल्ड कपमध्ये मिळवलेला पहिलाच विजय ठरला हे विशेष. युया ओसाका या लढतीचा सामनावीर ठरला. तसेच वर्ल्ड कपमध्ये इतक्या झटपट रेड कार्ड मिळालेला कार्लोस सांचेझ दुसराच खेळाडू ठरलाय.
ओसाकोचा ऐतिहासिक गोल
जपानकडून शिनजी कागवा याने सहाव्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करीत जपानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जुआन क्विंटेरोने ३९ व्या मिनिटाला फ्री किकवर जबरदस्त गोल करीत कोलंबियाला बरोबरी साधून दिली. व्हीएआर या टेवनॉलॉजीच्या सहाय्याने हा गोल ग्राह्य धरण्यात आला. पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी झाली होती. उत्तरार्धात युया ओसाकाने ७३ व्या मिनिटाला हेडरवर दमदार गोल करीत जपानसाठी इतिहास रचला.




























































