पूल वाहून गेल्याने जावळी तालुक्यातील आठ गावांचे दळणवळण ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जावळी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगणे ते पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेला आहे. यामुळे सात ते आठ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंबेघरमार्गे वळसा मारून यावे लागत आहे.

जावळी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगणे-पुनवडी दरम्यानचा पूल वाहून गेला होता. एक महिना उलटून गेला तरी अजून या पुलाचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा पूल वाहतुकीस बंद असल्याने पुनवडी, केडंबे, तळोशी, वाळंजवाडी, बाहुळे, भुतेघर, बोंडारवाडी ग्रामस्थांना डांगरेघर-आंबेघरमार्गे यावे लागत आहे. हे अंतर पुनवडीमार्गेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे केळघरला येताना वेळेचा अपव्यय होत आहे. त्यातच या मार्गावर वाहतुकीची सुविधा फारशी नसल्याने केळघर, मेढय़ाला बाजारहाट तसेच वैद्यकीय उपचारांसाठी जाताना त्रास सहन करावा लागत आहे.

या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केडंबेचे उपसरपंच महादेव ओंबळे, पुनवडीचे सरपंच सुरेश पार्टे, अंकुश बेलोशे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

नांदगणे ते पुनवडी दरम्यानच्या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जाते. पुलांची-साकवांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असतो. त्यामुळे या कामास निधी उपलब्ध होऊन मंजुरी मिळाली की कामास सुरुवात करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करेल.
– सारंग इनामदार, उपअभियंता, बांधकाम विभाग, जावळी.