जयाप्रदा भाजपमध्ये? रामपूरमधून लोकसभा लढवण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असून सोमवारी उशिरा त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. जयाप्रदा यांना रामपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देणार असल्याची माहिती मिळत आहे. रामपूरमधून जयाप्रदा यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे नेते आजम खान लढणार आहेत.

समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा आणि आझम खान यांच्यातील वाद तसा जूना आहे. “आझम खान यांच्या दादागिरीमुळेच मला रामपूर मतदारसंघापासून दूर रहावे लागते” असा आरोप जयाप्रदा यांनी केला होता. याचाच बदला घेण्यासाठी जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. जयाप्रदा यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोकदलच्या तिकिटावर लढवली होती. समाजवादी पक्षाने आजम खान यांना रामपूरमधून उमेदवारी घोषित केली आहे. जयाप्रदा यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांचा पराभव केला होता. त्यानंतर जयाप्रदा आणि आजम खान यांच्यातील वाद विकोपाला गेला.