
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई-मेन्सच्या मार्च सत्राचा निकाल आज जाहीर केला. या सत्रात देशातील 13 विद्यार्थ्यांनी 100 टक्के पर्सेंटाईल मिळवले असून त्यात महाराष्ट्रातील अथर्व तांबट आणि गार्गी बक्षी यांचा समावेश आहे. त्यांनी 300 पैकी 300 गुण मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
गेल्या 16 ते 18 मार्च दरम्यान झालेल्या या परीक्षेला 619368 विद्यार्थी बसले होते. जेईईसाठी चांगला कोचिंग क्लास मिळावा म्हणून गार्गी बक्षी ही दोन वर्षांपूर्वी नाशिकहून मुंबईला आली होती तर अथर्व तांबट हा वाशी येथे राहणारा आहे. तो सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. फेब्रुवारीच्या सत्रात केमिस्ट्री विषयात त्याला अपेक्षित गुण मिळाले होते. त्यामुळे पुढील सत्रासाठी त्याने वीस दिवसांत चांगला अभ्यास केला होता.
100 पर्सेंटाईल मिळवणाऱया अन्य विद्यार्थ्यांमध्ये दिल्लीची काव्या चोप्रा, पश्चिम बंगालचा ब्रतिन मंडल, तेलंगाणाचे बन्नूर रोहित कुमार रेड्डी, मदुर आदर्श रेड्डी आणि जोयसुला वेंकट आदित्य, बिहारचा कुमार सत्यदर्शी, तामिळनाडूचा अश्विन अब्राहम, राजस्थानचे मृदुल अग्रवाल आणि जेनिथ मल्होत्रा यांचा समावेश आहे.
जेईई-मेन परीक्षेच्या फेब्रुवारी सत्रामध्ये काव्या चोप्रा हिने 99.97 पर्सेंटाईल मिळवले होते. त्या कामगिरीवरही ती जेईई-अॅडव्हान्ससाठी पात्र ठरत होती. परंतु त्यापेक्षाही चांगली कामगिरी आपण करू शकतो असा तिला विश्वास होता.100 टक्के पर्सेंटाईल मिळवण्याचे तिचे लक्ष्य होते. ते मार्च सत्रातील परीक्षेत तिने पूर्ण केले.































































