नेटवर्क गुल झाल्याने जियोचं ग्राहकांना ‘हे’ विशेष गिफ्ट! वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओचे (Reliance Jio) नेटवर्क हे अत्यंत वेगवान आणि अखंड सेवा पुरवणारे मानले जाते. शनिवारी मात्र जिओच्या सेवेत काहीतरी बाधा निर्माण झाली आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. पण याची भरपाई करण्यासाठी जिओने एक खास भेट ग्राहकांना दिली आहे.

शनिवारी जिओ नेटवर्कच्या दांड्या गुल झाल्याने जिओ वापरणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट, फोनसेवेची मोठी समस्या उभी राहिली होती. ग्राहकांना काहीच माहिती मिळत नसल्याने ते हैराण झाले होते. अनेकांनी ट्विटरवर प्रश्न विचारून या समस्येबद्दल कोणाला काही माहिती आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने सगळ्या शहरातच जिओ नेटवर्कला बाधा निर्माण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. पण, तोपर्यंत ग्राहकांना नसता मनस्ताप झालाच होता. त्याची भरपाई करण्यासाठी सर्व जिओ ग्राहकांना रात्री एक विशेष मेसेज पाठवण्यात आला. त्यात जिओने ग्राहकांची माफी मागत त्यांना एक विशेष भेट देत असल्याचं जाहीर केलं.

या मेसेजनुसार, आमच्या सेवेच्या गुणवत्तेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. आज सकाळी दुर्दैवाने तुम्हाला आणि मुंबईतील काही अन्य ग्राहकांना सेवेत बाधा आल्याचा त्रास सहन करावा लागला. आमच्या चमूने या समस्येला काही तासांतच सोडवलं आणि सेवा पूर्ववत केली. पण, हा अनुभव फारसा चांगला नसेलच याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. त्यामुळे आम्ही तुमच्या क्रमांकावर दोन दिवसांचा असीमित डेटा प्लॅन मोफत देत आहोत. हा प्लॅन तुमची वर्तमान प्लॅनची वैधता संपल्यावर आपोआप सुरू होईल, अशी घोषणा या मेसेजमध्ये करण्यात आली आहे. यामुळे जिओच्या ग्राहकांना आता त्यांच्या प्लॅनची वैधता संपल्यावर दोन दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन मिळणार मिळणार आहे.