सत्तेपुढे गुडघे टेकतात त्यांना आदर्शवादाची लढाई काय कळणार? जितेंद्र आव्हाड यांचा मिटकरींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारीचे रायगडावर अनावरण करण्यात आले. त्या सोहळ्यात जितेंद्र आव्हाड यांनी देखील तुतारी वाजवली. त्यांचा तुतारी वाजवतानाच एक व्हिडीओ अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना त्यांना कुल्फीवाले म्हटले. त्यावर ट्विट करताना आव्हाड यांनी मिटकरींना फटकारले आहे, तसेच चेक नीट लिहायला शिका, असा टोला लगावला आहे.

”कुल्फिवाले म्हणून तुम्ही ज्यांची टिंगल करताय,त्याच्या पिपाणीचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही,कारण आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रोज तीच पिपाणी वाजवून हा कुल्फीवाला स्वाभीमानाची लढाई लढत असतो.तीच पिपाणी वाजवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असतो.त्याच्यासाठी तीच पिपाणी तुतारीच असते. तुमच्यासारख्या मिध्यांना कष्टकरी कुल्फिवाल्याच्या पिपाणीचं महत्त्व कळणार नाही. कुल्फिवाल्याचा जीवनसंघर्ष ज्यांना हास्यास्पद वाटतोय त्यांनी सर्व मूल्ये आणि तत्त्वांवर केव्हाच पाणी सोडलंय. तुमच्यासारखी लोकं जी सत्तेपुढे गुडघे टेकतात त्यांना आदर्शवादाची लढाई काय कळणार…? शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात पिपाणी वाजवणा-यांची लढाई ज्यांना कळली नाही ते सामान्य लोकांच्या हक्कांसाठी काय लढणार? शिवरायांनी फुंकलेली तुतारी कष्टकरी लोकांच्या हक्कासाठीच होती, हे विसरू नका. आणि हो,व्हिडिओ एडीटींग मस्त केलेय, आता फक्त चेक नीट लिहायला शिका’, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.