जम्मू-कश्मीर – दहशतवाद्याने पोलीस अधिकाऱ्याची दिवसाढवळ्या केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी दहशतवाद्याने एका पोलीस अधिकाऱ्याची दिवसाढवळ्या हत्या केली. श्रीनगरच्या खानयार भागामध्ये हत्या करण्यात आलेल्या या अधिकाऱ्याचे नाव अर्शिद अहमद मीर आहे. पोलिसाच्या हत्येचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

खानयार भागातून पायी जात असताना पोलीस उपनिरीक्षक अर्शिद अहमद मीर याच्यावर दहशतवाद्याने पाठिमागून गोळीबार केला. दहशतवाद्याने मीर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या मीर यांना तात्काळ श्रीनगर येथील शेर ए कश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अर्शिद अहमद मीर हे कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि श्रीनगरमधील खानयार भागात तैनात होते. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास दहशतवाद्याने त्यांना एकटे गाठत गोळीबार केला. गोळीबारानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, ही घटना दुर्दैवी असून आपण एक तरुण अधिकाऱ्याला गमावल्याचे जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले. तसेच या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले.