जातीअंताचे नाव घेणाऱ्यांनीच उमेदवारांच्या जातीचा उल्लेख केला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jogendra-kawade

सामना ऑनलाईन । नगर

जातीच्या अंतासाठी लढणाऱ्या ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. या कृतीतून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

जोगेंद्र कवाडे म्हणाले, ऍड. आंबेडकर हे आजपर्यंत जातीअंताविषयी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनीच त्यांच्या उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे. आता आंबेडकर यांच्या जातीअंताच्या लढय़ाला काय अर्थ आहे, असाही सवाल कवाडे यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीत पीपल्स रिबब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व लोकाधिकार पक्षांची महाअघाडी आहे. आम्ही महाआघाडीकडे महाराष्ट्रातील चार जागांची मागणी केली आहे. यात शिर्डी, अमरावती, रामटेक व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान दोन जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला, तर आपण स्वतः निवडणूक लढवणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, असे कवाडे यांनी सांगितले.