
सामना प्रतिनिधी । मुंबई
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे नव्याने जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. रावसाहेब दानवे यांचा समावेशही मंत्रिमंडळात करण्यात आल्याने भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी कुणाकडे सोपविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देणार्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रात मंत्रीपद देऊन त्याचे बक्षीस देण्यात आले. यापुढील काळात विविध राज्यांत होणार्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता भाजपच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी जे. पी. नड्डा यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. राज्यसभा खासदार असणारे नड्डा हे भाजपचे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपने 80 जागांपैकी 62 जागा मिळवल्या. नड्डा हे पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या विश्वासातले नेते असल्याने भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांचीच निवड होणार असल्याची चर्चा आहे.
महाजन, मुनगंटीवार यांची नावे चर्चेत
भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू जलसंपदा मंत्री गिरीश महाजन किंवा संघटनात्मक कामात कर्तबगार असणारे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. 2014 मध्ये प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या जागी कोण, असा प्रश्न निर्माण झाला त्या वेळी दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावून त्यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता संघटनकौशल्य असणार्या महाजन, मुनगंटीवार, संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या नावांची चर्चा आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचा कार्यकाळ संपत असून धक्कातंत्राचा अवलंब करत कदाचित त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी भाजपमध्ये चर्चा आहे.





























































