
जागतिक वारसास्थळाचा दर्जा असलेल्या कास पुष्पपठारावरील रंगीबेरंगी रानफुलांचा फुलोत्सव निसर्गप्रेमींसाठी खुला झाला असून, पहिल्याच दिवशी 205 जणांनी कास पुष्पपठाराचा नजारा अनुभवला. सद्यस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार असून, 1 सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीनेच बुकिंग केलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.
पर्यटकांना बुकिंगसाठी www.Kas.ind.in या वेबसाइटवर जाऊन आगावू प्रवेश शुल्क भरून अगोदर बुकिंग करावे लागणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचे नियम पाळून हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून, प्रतिपर्यटक 100 रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. पहिल्या दिवशी 205 पर्यटकांनी कास पुष्पपठाराला भेट दिली.
समितीने 140 प्रशिक्षित कर्मचाऱयांची हंगामासाठी नेमणूक केली असून, वाहनतळ, पिण्याचे पाणी, शौचालय, निवारा शेड, तिकीट घर, गाइड आदी व्यवस्था सुरळीत केल्या आहेत. पठारावर वाहन नेण्यास मनाई असल्याने वाहनतळ ते पठार अशी बससेवा समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. कास पठाराबरोबरच पर्यटक परिसरातील बामणोली, वजराई धबधबा, एकीवचा धबधबा, नारायण महाराज मठ, पवनचक्की प्रकल्प आदी परिसरातील पर्यटनस्थळांना पर्यटक भेटी देत आहेत.
























































