सही है भिडू! चित्याची झेप घेणारा लाल मातीतला कबड्डीपटू, व्हिडीओ व्हायरल

1654

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राचा आलेख उंचविणारा कबड्डी हा खेळ. ‘प्रो कबड्डी’ सुरू झाल्यापासून या लोकप्रियतेला व्यवसायिक स्वरुप आले. संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातही कबड्डी खेळाची लोकप्रियता आजही कायम आहे. ग्रामीण भागातील मुलेही आक्रमक कबड्डी खेळताना पहायला मिळाले ते जिल्हापरिषदेच्या आतंरशालेय क्रीडा स्पर्धेत. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी जिल्हापरिषद शाळेत पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या आयुष रवींद्र मुळ्ये यांची कबड्डी खेळातील पकड पाहून भल्या भल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत.

अतिशय गरीब कुटूंबात जन्मलेला आयुष रवींद्र मुळ्ये याचे आई-वडील मजूरी करतात. त्यामुळे तो शिक्षणासाठी तो पांगरी गावातून रत्नागिरीत मावशीकडे आला. कारवांचीवाडी शाळेत तो शिकत आहे. नुकत्याच झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील कबड्डी सामन्यात त्याने चित्याच्या चपळाईने झेप घेत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला बाद केले.

आयुषची खेळातील आक्रमकता पाहून सर्वांनी कौतुक केले. भविष्यातील प्रतिभावान कबड्डीपटू लालमातीत तयार होत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कबड्डी सामन्यातील आयुषचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग यांनी स्पोर्ट किट देऊन त्याचा गौरव केला आहे. प्रभाकर कांबळे हे आयुषचे प्रशिक्षक आहेत.

गावातील मुलांसोबत कबड्डी खेळताना आयुषने पकड टाकण्याचे कसब हस्तगत केले आहे. प्रतिस्पर्धी संघातील चढाई करणाऱ्या खेळाडूच्या डोळ्याचे पाते लवते न लवते तोच आयुष त्याच्या अंगावर झडप घालतो. पाचवीत शिकणाऱ्या आयुषला योग्य प्रशिक्षण आणि सहकार्य मिळाल्यास कबड्डीच्या विश्वात तो रत्नागिरीचे नाव उज्वल करू शकतो. ग्रामीण भागातील मुलांमध्ये क्रीडा गुणवत्ता आहे ती गुणवत्ता शोधून तिला व्यासपीठ देण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या