
कल्पिता राणे… ती जिद्दी आहे, महत्त्वाकांक्षी आहे. म्हणूनच तर गेल्या वर्षी मिसेस इंडिया वर्ल्ड स्पर्धेत तिने ‘मिसेस टॅलेंटेड’ हा खिताबही पटकावलाय.
स्वतः आभाळात भरारी घेण्याची आकांक्षा उराशी बाळगतानाच इतर मध्यमवर्गीय स्त्र्ायांनीही उडण्याची स्वप्न पाहावीत. त्यासाठी आपला काहीतरी हातभार त्या स्त्रीयांना लाभावा असं साधं सोपं गणीत मनात घेऊन कल्पिता राणे हिने थेट साता समुद्रापार भरारी घेतली आहे. गेल्या वर्षी ‘मिसेस इंडिया वर्ल्ड’ स्पर्धेत ती सहभागी झाली होती. त्यात तिने ‘मिसेस टॅलेंटेड’ हा खिताब पटकावला आहे. विशेष म्हणजे अंतिम ६० स्पर्धकांपैकी ती एकटीच अशी होती जिला त्या ठिकाणी फायनलच्या दिवशी डान्स परफॉर्म करायची संधी देण्यात आली होती.
अभ्युदय नगरमधील कामगार कल्याण येथे लहानाची मोठी झालेल्या कल्पिताला नृत्याची आवड लहानपणापासूनच… त्यातच करीयर करायचं तिने तेव्हापासूनच पक्कं ठरवून टाकलं होतं. आपली कला आपल्यापर्यंतच न ठेवता ती दुसऱ्यांनाही देण्याच्या उद्देश्याने आता ती ‘कल्पांगण’ नावाच्या संस्थेद्वारे मुलींना नृत्याचे धडे देतेय. त्याव्यतिरिक्त ज्या महिला फिटनेस फ्रिक आहेत त्यांच्यासाठीही खास फिटनेस वर्गही तेथ चालतो. ती भरतनाटय़म विशारद झाली असून त्यानंतर नालंदामधून पारंगतही पूर्ण केलं. भरतनाटय़मसाठी तिला दिल्ली बोर्डाची स्कॉलरशिपही मिळाली आहे. सध्या ती अलका लाजमी यांच्याकडे पुढचं प्रशिक्षण घेतेय.
आपल्याविषयी माहिती देताना ती सांगते, मी अभिनयही करते. दोन तीन वर्षांपूर्वी नाटकांचे काही प्रयोगही मी केले आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षेबद्दल बोलताना ती म्हणते, दुसऱ्या कुणाला तरी आयडॉल मानण्यापेक्षा आपण कुणाचे तरी आयडॉल होऊ शकतो असं प्रत्येकीला वाटायला हवं असं वाटतं. मध्यमवर्गीय स्त्रीयांनीही उडण्याची स्वप्नं पाहायला हवीत अशी माझी इच्छा आहे.























































