
सामना प्रतिनिधी । कल्याण
पालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासनाने नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी कोलब्रो कंपनीला 10 कोटींचा ठेका दिला. मात्र नवीन मालमत्तांचा रिपोर्ट देण्याआधीच प्रशासनाने ठेकेदारावर 6 कोटी कुर्बान केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने कोलब्रो कंपनीला 2016 मध्ये कंत्राट दिले. सर्वेक्षणातून किती नवीन मालमत्तांचा शोध लागला याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी महासभेत विचारली होती. यावेळी कोलब्रो कंपनीने 4 लाख 55 हजार 195 मालमत्तांचे सर्वेक्षण केल्याची माहिती प्रशासनाने दिली. धक्कादायक बाब म्हणजे नवीन मालमत्ता किती शोधल्या याची तपासणीच केली नसल्याचे बेजबाबदार उत्तर प्रशासनाने दिले आहे. अधिकाऱ्यांशी ‘हातमिळवणी’ करून कोलब्रो कंपनीने पालिकेची लूट केल्याने प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमके सर्वेक्षण कशासाठी?
महापालिका क्षेत्रतील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे कंत्राट कोलब्रो कंपनीला 2016 मध्ये दिले होते. या कंपनीने नव्या मालमत्तांचा शोध घेणे, त्यांचे क्षेत्रफळ मोजणे, त्यांना होत असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या नळ जोडण्या अधिकृत की बेकायदा आहेत याचा तपशीलवार सर्व्हे करायचा होता.
सगळा सावळागोंधळ तरीही प्रशासन मेहरबान
कंपनीने किती नवीन मालमत्तांचा शोध घेतला? वाढीव क्षेत्रफळाच्या मालमत्ता किती आढळून आल्या? वापरात बदल केलेल्या मालमत्ता किती मिळून आल्या? याचा काहीच तपशील कोलब्रोने दिलेला नाही. सगळा सावळागोंधळ असतानाही कोलब्रो कंपनीवर प्रशासन मेहरबान झाले आणि 6 कोटी 56 लाख बिल आदा केले. त्यामुळे कंपनीने नव्या मालमत्तांचा तपशील देईपर्यंत उर्वरित 3 कोटी 44 लाख रुपयांचे बिल रोखून धरावे, अशी मागणी आयुक्तांकडे नगरसेवकांनी केली आहे.
























































