हुंड्यासाठी सुनेचे टक्कल केले; वालधुनीमधील घटना, लोकांमध्ये संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kalyan-waldhuni-shocker-pregnant-woman-tonsured-by-in-laws-for-dowry-treatment-in-ulthasnagar

हुंड्यासाठी सुनेचे चक्क टक्कल केल्याची अमानुष घटना कल्याणच्या वालधुनीत घडली आहे. अफसाना अन्सारी असे या पीडितेचे नाव असून तिने कशीबशी सासरच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून क्रौर्याच्या गाठलेल्या परिसिमेने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अफसाना हिचा विवाह कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी याच्यासोबत झाला. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच तिचा हुंडय़ाकरिता छळ सुरू झाला असा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती गर्भवती असतानाही तिला सासरच्या मंडळींकडून व्यवस्थित जेवणदेखील दिले जात नव्हते. फ्रीजमधील अन्न कुलूप लावून ठेवण्यात येत होते, असा आरोप अफसाना हिने केला आहे. अफसाना हिच्याकडे सासरच्या लोकांनी वारंवार पैशांसाठी तगादा लावला. तिला मारहाणदेखील करण्यात आली. आपल्या आईवडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची असल्याने अफसाना हिने गुपचूप त्रास सहन केला. मात्र सासरच्या मंडळींनी 7 जून रोजी तिच्या डोक्यात उवा झाल्या आहेत असे खोटे सांगून तिचे जबरदस्ती टक्कल केले. याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी पीडित महिलेचा भाऊ नीर हसन अन्सारी यांनी केली आहे.