करप्शन नाथ है ये जी… सबको लूट खाएगा; कमलनाथांना गळ टाकणाऱया भाजपच्या यूटय़ूबवरचे गाणे व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोडीफोडीचे राजकारण करणाऱया भाजपने आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी गळ टाकला आहे. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ काँग्रेसचा हात सोडून कमलाबाईच्या वळचणीला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या असताना आता भाजपने दोन महिन्यांपूर्वी आपल्या अधिकृत यूटय़ूब चॅनेलवरून प्रसिद्ध केलेले गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘करप्शन नाथ है ये जी… सबको लूट खाएगा’ असे या गाण्याचे बोल आहेत.

आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची भीती दाखवत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. अशोक चव्हाण यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा जोरदार टीका केली. निवडणुकीच्या रिंगणात आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर अनेकदा तोंडसुख घेतले. या देशातील शहीदांच्या माता, भगिनी अशोक चव्हाण यांना कधीही माफ करणार नाहीत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांना भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमधून धुऊन काढले. आता कमलनाथ यांचाही पक्षप्रवेश घडवून आणून त्यांनाही स्वच्छ करण्याच्या दृष्टीने भाजपा कामाला लागल्याची चर्चा आहे.

व्हिडीओतून मांडला भ्रष्टाचाराचा खेळ
भाजपाने दोनच महिन्यांपूर्वी कमलनाथ यांच्यावर सडकून टीका करणारा व्हिडीओ आपल्या अधिकृत यूटय़ूब अकाऊंटवरून पोस्ट केला होता. यात त्यांनी कमलनाथ सरकारच्या भ्रष्टाचाराचा खेळच दाखवला होता. गहू घोटाळा, सीडी घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, कर्जमाफी, खत घोटाळा, मोबाईल घोटाळा, सिंचन घोटाळा असे अनेक आरोप व्हिडीओतून करण्यात आले. अल्ताफ राजाच्या सुपरहिट गाण्याची चाल भाजपने आपल्या गाण्याला लावली असून ‘करप्शन नाथ है ये जी… सबको लूट खाएगा… कुर्सी मीली तो ये एमपी बेच खाएगा’ असे गाण्याचे बोल आहेत.