मध्य प्रदेशातील सहा बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी,कमलनाथ यांची विश्वासदर्शक ठरावाला तयारी

8453

मध्य प्रदेश सरकारमध्ये घोंगावलेले राजकीय वादळ अजूनही शांत झालेले नाही. शुक्रवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शिफारसीवरून सहा मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले. या मंत्र्यांचा काँग्रेसच्या 22 बंडखोर आमदारांमध्ये समावेश आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सायंकाळी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी दाखवली. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी निश्चित केलेल्या 16 मार्चला विश्वासदर्शक ठरावासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे कमलनाथ यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले. काँग्रेसच्या 22 आमदारांना भाजपनेच आपल्या ताब्यात ठेवले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सुरक्षेचे कारण देत बंडखोरांचा बंगळुरूमध्येच मुक्काम

बंडखोर आमदार शुक्रवारी बंगळुरूमधून भोपाळला परतणार होते, मात्र आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करीत त्यांनी बंगळुरू विमानतळावरून पुन्हा हॉटेल गाठले. या 22 आमदारांच्या राजीनाम्यामुळेच कमलनाथ सरकार चिंतेत सापडले आहे.

या मंत्र्यांची हकालपट्टी

राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शिफारसीवरून ज्योतिरादित्य शिंदे समर्थक सहा मंत्र्यांना पदावरून हटवले. इमरती देवी, तुलसी सिलावट, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युम्न सिंह सिसोदिया आणि प्रभुराम चौधरी अशी या मंत्र्यांची नावे आहेत. या मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य यांना पाठिंबा देत कमलनाथ यांच्याविरोधात बंड पुकारले होते

आपली प्रतिक्रिया द्या