गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंगना राणावत हिने मुंबईचा तसेच मुंबई पोलिसांना बदनाम करणारे वक्तव्य केले आहे. सुशांत सिंह राजपूत केसमध्येही ट्विट करून अनेक कलाकारांवर अमली पदार्थांच्या सेवन प्रकरणी आरोप केले आहेत. काही कलाकारांनीदेखील कंगना राणावत अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सदस्यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक तसेच पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची दखल घेत ड्रग्ज प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे.

कंगना राणावत हिने केलेले वक्तव्य तसेच अंमली पदार्थ सेवनाबाबत प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षांना पत्र दिले होते. या प्रकरणी 24 तासात अहवाल देण्याचे निर्देश उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. त्याचप्रमाणे सुनील प्रभू यांनी यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार आज प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात निवेदन सादर करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली. त्याचप्रमाणे यावर बोलताना अबु आझमी यांनीही कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अर्णब गोस्वामीला तुरुंगात पाठवा तर कंगनावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर अनिल देशमुख यांनी निवेदन दिले.

भाजपनेही निषेध करायला हवा

परप्रांतातून एखादी मुलगी येते, नाव कमावते, पैसे कमावते. मुंबई तिला स्वीकारते. पण नाव कमावल्यानंतर ती महाराष्ट्र मुंबईच्या बाबतीत अवमानजनक विधान करीत असेल तसेच मुंबई पोलिसांचा अवमान करीत असेल तर त ते खेदजनक आहे. हा अवमान महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात कसाबसारख्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याचे काम या पोलिसांनी केले आहे. त्यांचा अवमान करणे हे दु:खदायक आहे. महाराष्ट्र हा महाविकास आघाडीतील पक्षांप्रमाणे भाजपचाही आहे. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी कंगनाचा निषेध करायला हवा, असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

अध्ययन सुमन याच्या वक्तव्यानुसार चौकशी

कंगना ड्रग्स घेते असा आरोप शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. कंगना ड्रग्ज घेते आणि ते घेण्यासाठी बळजबरी करते, असे त्याने म्हटले होते. अध्ययन सुमनच्या या वक्तव्याच्या आधारे ही चौकशी केली जाणार आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

…तर मुंबई सोडून जाईन – कंगना

मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय, असे कंगना राणावतने म्हटले आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येचीही चौकशी

छगन भुजबळ यांनी वास्तुविशारद अन्वय नाईक याच्या आत्महत्येचे काय झाले असा प्रश्न विचारला होता. त्याचप्रमाणे सुनील प्रभू यांनी नाईक यांनी चिठ्ठीत कुणाची नावे लिहिली होती असा सवाल केला होता. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाचे काम करूनही नाईक यांना 80 लाख रुपये मिळाले नव्हते, अशी तक्रार त्यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केली होती. त्यामुळे याबाबतही चौकशी करण्यात येईल, असे अनिल देशमुख म्हणाले. कंगना राणावत हिने केलेले वक्तव्य तसेच अंमली पदार्थ सेवनाबाबत प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षांना पत्र दिले होते.