चिनी गुंतवणूवकदारांना घाबरवण्यासाठी कराची हल्ला; पाकड्यांचा कांगावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कराची

कराचीमध्ये चीनच्या वाणिज्य दूतावासाबाहेर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान आणि चीनचे व्यावहारिक आणि आर्थिक संबंध वृद्धिगंत होत आहेत. मात्र, काही जणांना हे पाहवत नसल्याने त्यांनी चीनी गुतंवणूकदारांना घाबरवण्यासाठी हा हल्ला केल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. मात्र, दहशतवाद्यांचे मनसूबे सफल होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या कार्यकाळात चीनबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही देशात आर्थिक, सामाजिक, व्यावहारिक आणि लष्करी सहकार्य वाढत आहे. त्यामुळे चीनी गुंतवणुदारांना घाबरवण्यासाठी असा हल्ला करण्यात आला. मात्र, अशा हल्ल्यांनी चीनबरोबरच्या आमच्या संबंधात फूट पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानात शुक्रवारी दोन मोठे दहशतवादी हल्ले करण्यात आले. कराचीत चीनच्या वाणीज्य दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटात सातजणांचा मृत्यू झाला. तर खैबर पख्तूनख्वा प्रांतात वर्दळ असलेल्या बाजारात करण्यात आलेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला. तर 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या दोन्ही हल्ल्यांचा इमरान यांनी निषेध केला असून पाकिस्तानात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. मात्र, आम्ही दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानमध्ये या वर्षात चीनच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चीनी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आलेला हा दुसरा हल्ला आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून फेब्रुवारीमध्ये चीनच्या शिपिंग अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाकिस्तानातील विविध योजनांसाठी चीनने सुमारे 60 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुतंवणूक केली आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांमुळे चीनची चिंता वाढली आहे. चीनशी असलेल्या चांगल्या संबंधात दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी पाकिस्तानने कांगावा करण्यास सुरुवात केली आहे.