
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमधे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांच्यावर पाटण येथे धडक कारवाई होत असून रस्त्यावर सापडेल तिथे कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना पॉजिटिव्ह सापडल्यास दंडात्मक कारवाई करून डायरेक्ट कोविड सेंटरला रवाना, तर निगेटिव्ह सापडल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे.
प्रशासनाच्या या कारवाईवर सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कडक भूमिका प्रशासनाने राबवावी तरच विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसेल. तहसिलदार योगेश्वर टोंणपे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी पाटण शहरात धडक कारवाईची मोहीम राबवून विनाकारण रस्त्यावरुन बेफिकीर फिरणाऱ्या नागरिकांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सापडला की डायरेक्ट कोरोना टेस्ट, पॉजिटिव्ह आला की डायरेक्ट कोरोना सेंटर, यामुळे पाटण शहरातील नागरिकांनी घरीच बसणे पसंत केले आहे.
निष्काळजीपणे वागणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. असे तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी सांगितले. या कारवाईत गट विकास अधिकारी मीना सांळुखे, पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ, पाटण पोलिस, पाटण नगरपंचायत कर्मचारी यांचा सहभाग घेतला आहे.
























































