घराचा हिस्सा व रेशनिंगच्या धान्यासाठी सख्खा भाऊच झाला पक्का वैरी; मारेकऱ्याने शर्ट बदलला आणि कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचे अवघ्या 36 तासांत गूढ उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. घराचा हिस्सा आणि रेशनिंगच्या स्वस्त धान्यासाठीच सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. हनुमंत पाटील याने त्याचा सख्खा भाऊ, गर्भवती वहिनी आणि चिमुकल्या पुतण्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची कबुली दिली आहे. कोणालाही संशय येऊ नये म्हणून नातेवाईकांच्या घरी गेलेल्या हनुमंतने हत्येनंतर शर्ट बदलून टी शर्ट घातले आणि त्याचा खेळ खल्लास झाला. रायगड पोलिसांनी केलेल्या तपासात सख्ख्या भावाने नात्याची हत्या केल्याचे सत्य उघडकीस आल्यानंतर अवघा कर्जत तालुका हादरून गेला आहे.

8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिकनपाडा गावाच्या हद्दीत नाल्यामध्ये एका 9 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत ओळख पटल्यानंतर मृतदेह या मुलाच्या घरी नेण्यात आला. परंतु घरी मुलाचे आई-वडील आढळून न आल्याने संशय आलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा नाला परिसरात तपासकार्य केले. यावेळी नदीमध्ये पडलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीजवळ मृत मुलाची आई अनिशा पाटील हिचा मृतदेह सापडला. तर पुढे काही अंतरावर मदन पाटील याचाही मृतदेह आढळून आला. तिन्ही मृतदेहांच्या डोक्यावर, कपाळावर, कानावर धारदार हत्याराने केलेल्या जखमा दिसून आल्याने ही हत्या असल्याचे लक्षात आले.

पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला

मृत मदन पाटील व त्याचा सख्खा भाऊ हनुमंत पाटील यांचा घराच्या हिश्श्यावरून तसेच रेशनिंग कार्ड वेगळे करण्यावरून वाद सुरू असल्याचे तपासात पुढे आले. काही वर्षांपूर्वी याच कारणावरून हनुमंतने भाऊ व त्याच्या बायकोला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी हनुमंतला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने या हत्याकांडाची कबुली दिली.

मामा झोपला आणि तो घरी सटकला

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हनुमंत आपल्या बायकोसह 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पोशीर या गावात राहणाऱ्या आपल्या चुलत मामाकडे बाप्पाच्या दर्शनासाठी गेला. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर मामा व घरातील अन्य सदस्य झोपी जाताच हनुमंत माळ्यावरून खाली उतरला आणि तडक चिकनपाड्यातील भावाच्या घरी गेला. त्याने झोपेत असलेला भाऊ मदन, गर्भवती वहिनी व पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर तीनही मृतदेह घराच्या मागे असलेल्या नाल्यात फेकून पुन्हा तो चुलत मामाच्या माळ्यावर जाऊन झोपला. दरम्यान त्याने हत्या केल्यानंतर रक्ताने माखलेला शर्ट काढून टी शर्ट घातला. तपासात नातेवाईकांनी हीच माहिती देताच पोलिसांनी हनुमंत याची उलट तपासणी घेतली. त्यामुळे मारेकरी गोंधळला आणि त्याने हत्येची कबुली दिली. गावात पोलिसांना यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळाले असून मारेकऱ्याचा शर्ट आणि त्याने वापरलेल्या कुऱ्हाडीचा पोलीस शोध घेत आहेत.