777 Charlie हा चित्रपट पाहिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री ढसाढसा रडले, ‘हे’ आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता रक्षित शेट्टी याची प्रमुख भूमिका आणि किरणराज के यांनी दिग्दर्शित केलेला ‘777 चार्ली’ (777 Charlie) हा कन्नड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनाही हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर ते खुपच भावूक झाले आणि त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अक्षरश: ढसाढसा रडले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 13 जूनला ‘777 चार्ली’ (777 Charlie) हा चित्रपट पाहिला. एक माणूस आणि कुत्रा यांच्यातील नाते दाखवणारा हा चित्रपट पाहून मुख्यमंत्री बोम्मई भावूक झाले. चित्रपट पाहिल्यानंतर ते ढसाढसा रडू लागले. याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना हा चित्रपट खुपच आवडला असून त्यांनी या चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांचे कौतुकही केले. तसेच सर्वांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले.

कुत्र्यांसर अनेक चित्रपट आले आहेत, परंतु या चित्रपटातील भावना वेगळ्या आहेत. कुत्रा आपल्या डोळ्यांद्वारे भावना व्यक्त करतो. चित्रपट खुपच चांगला असून सर्वांनी बघावा असा आहे. आपण नेहमी बिनशर्त प्रेमाबाबत बोलत असतो आणि कुत्र्याचे प्रेम हे बिनशर्त आणि शुद्ध असते, असे मुख्यमंत्र्यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना म्हटले.

…म्हणून झाले भावूक

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे श्वानप्रेमी असून त्यांना कुत्र्यांची आवड आहे. गेल्या वर्षीच त्यांच्या पाठीव कुत्र्यांचे निधन झाले. बोम्मई कुटुंबाने कुत्र्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले होते. याचे फोटोही व्हायरल झाले होते. ‘777 चार्ली’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आपल्या पाठीव कुत्र्याची आठवण झाली आणि म्हणून ते ढसाढसा रडले.

काय आहे चित्रपट?

‘777 चार्ली’ हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये ‘धर्मा’ या व्यक्तीचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. धर्मा हा एका फॅक्टरीमध्ये काम करत असतो आणि एकटाच राहात असतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात चार्लीची एन्ट्री होते. चार्ली हा एक लॅब्राडोर कुत्रा आहे. चार्लीची एन्ट्री झाल्यानंतर धर्माच्या आयुष्यात जे काही घडते, ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. चार्ली आणि धर्मामधील नाते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.