
कर्नाटकची उपराजधानी आणि मराठी भाषिकांच्या चळवळीचे केंद्र असलेल्या सीमाभागात 18 पैकी 13 जागांवर काँग्रेसचा विजय झाला. यामध्ये राजसत्ता आणि धनशक्तीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या साथीने महाराष्ट्र एकीकरण समितीने लढा दिला. समितीच्या पाच उमेदवारांना जरी विधानसभेत जाता आले नसले, तरी मतांची टक्केवारी चांगलीच वाढल्यामुळे पुन्हा संघर्ष करण्याचे बळ मराठी भाषिकांना मिळाले आहे. या पाच जागांमध्ये काँग्रेसला तीन, तर भाजपला दोन जागा मिळाल्या.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रारंभी बेळगाव दक्षिण आणि खानापूर मतदारसंघात पहिल्या तीन ते चार फेऱयांत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची सरशी दिसून आली. या दोन्ही मतदारसंघांत चुरस वाढली होती. शेवटी बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील विजयी झाले. त्यांना 77,094 मते मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर यांना 64,786मते मिळाली. कोंडुसकर यांचा 11 हजार 762 मतांनी पराभव झाला असला, तरी येथे मराठी भाषिकांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होऊन 10 हजारांहून अधिक मतांची भर पडल्याचे दिसून आले.
खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी 91 हजार 237 इतके मताधिक्य घेत विजय मिळविला. येथे काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा पराभव झाला. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एक लाख सहा हजार 590 इतके सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजय नोंदविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना 41 हजार 247, तर भाजपचे नागेश मन्नोळकर यांना 51 हजार 39 मते मिळाली.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित असणाऱया बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे असिफ (राजू सेठ) यांनी केवळ सात हजार मतांच्या फरकाने भाजपचे रवि पाटील यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार राजू सेठ यांना 51 हजार 223, तर रवि पाटील यांना 49 हजार 141 मते मिळाली आहेत. यमकनमर्डी मतदारसंघात काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुन्हा विजयी झाले. भाजपचे उमेदवार बसवराज हुंदरी यांचा त्यांनी पराभव केला. येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मारुती नाईक यांनाही पराभवास सामोरे जावे लागले.
याशिवाय उमेदवारी नाकारल्याने भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे अथणी मतदारसंघातून एक लाख 27 हजार 615 मतांनी विजय झाले. भाजपचे महेश कुमठळ्ळी यांचा त्यांनी पराभव केला. तर, निपाणी येथे भाजपच्या विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यांना 72 हजार 952 मते पडली, तर येथे सुरुवातीपासून चुरस निर्माण केलेले राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना 65 हजार 614 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार काका पाटील तिसऱया स्थानावर राहिले.
सीमावासीय मराठी भाषिक पुन्हा लढण्यास सज्ज
बेळगाव जिल्ह्यातील 18पैकी 13 मतदारसंघांत काँग्रेसचा विजय झाला, तर उर्वरित मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. या 18पैकी पाच मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे, या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी जाहीर प्रचारसभा घेऊन मराठी भाषिकांमध्ये उत्साह निर्माण केला होता. परिणामी, सीमाभागात भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून मराठी भाषिकांनी निदर्शने केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही निषेध केला. तसेच प्रचारासाठी महाराष्ट्रातून आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनाही मराठी भाषिकांनी विरोध केला होता. आजच्या निकालात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव होऊन त्यांना विधानसभेत जाता येत नसले, तरी एकीमुळे वाढलेल्या मराठी मतांच्या टक्केवारीमुळे पुन्हा नव्याने लढण्याचे बळ मिळाले आहे.
























































